

कराड : येथील शहर पोलीस ठाण्यातील तक्रार अर्ज प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी 7 हजारांची लाच स्वीकारणार्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकास न्या. दि. बी. पतंगे यांनी दोन वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भरत गोपाळ होळकर (वय 66) असे या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुलाब रामचंद्र गुजर (रा. केर, ता. पाटण) यांनी फिर्याद दाखल केली होती. आरोपी होळकर हे कराड शहर पोलीस ठाण्यात 2014 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. यावेळी होळकर यांनी 7 हजार रुपयांची मागणी केली होती. गुजर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जाचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी पंचाच्या समोर होळकर यांनी 7 हजार स्विकारले होते. कराड पंचायत समिती परिसरात दर्शन रेस्टॉरंटसमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने होळकर यांना रंगेहाथ पकडल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी तपास करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. दि. बी. पतंगे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाकडून एम. व्ही. कुलकर्णी व आर. डी. परमाज यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून चार साक्षीदार तपासण्यात आले असून अॅड. एम. व्ही. कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानत आरोपी निवृत्त पोलीस निरीक्षक भरत होळकर यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. लाचलुचतप प्रतिबंध कायदा कलम 7 अन्यवे एक वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर कलम 13 (1)(डी),13(2) अन्यवे 2 वर्ष सक्तमजुरी व 10 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.