

सातारा : सातारा पोलिस दलातून निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्याला अनोळखी महिलेने व्हिडीओ कॉल करून ‘तुमच्या बँक खात्यावर करोडो रुपये आल्याचे’, खोटे सांगून डिजिटल अरेस्ट (ऑनलाईन अटक) केल्याचे सांगितले. यानंतर सायबर फसवणूक करणार्या भामट्यांनी निवृत्त पोलिस अधिकार्याची ऑनलाईन 5 लाख 35 हजार 599 रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना दि. 2 ते 12 ऑगस्ट 2025 या कालावधीत घडली आहे. सातार्याजवळ घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 2 ऑगस्ट रोजी तक्रारदार निवृत्त पोलिस अधिकारी दुपारी आराम करत होते. त्यावेळी अनोळखी क्रमांकावरून महिलेचा त्यांना व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉलवरील महिलेने मुंबई येथील कुलाबा पोलिस ठाण्यात हिंदीतून बोलत आहे, असे भासवले. तक्रारदारांना आधार कार्ड हरवले आहे का? अशी विचारणा केल्यावर तक्रारदारांनी होअसे सांगितले.
त्यावर आंध्रा बँकेत तुमच्या खात्यावर करोडो रुपयांचा चुकीचा व्यवहार झाला अहून वरिष्ठ पोलिस अधिकारी तुम्हाला बोलतील असेही महिलेने सांगून फोन ठेवला. यामुळे तक्रारदार घाबरले. तोपर्यंत दुसर्या अनोळखी नंबरवरुन पोलिस गणवेश घातलेल्या व्यक्तीने फोन करुन ‘तुमच्या नावाने बेहिशोबी मालमत्ता व खात्यावर रक्कम आली आहे. यामुळे तुमची गोपनीय चौकशी करावी लागेल. तुम्हाला याबाबतची माहिती कोणालाही देता येणार नाही. अटक टाळायची असेल तर 5 लाख पाठवावे लागतील. चौकशी पूर्ण झाली की तुम्हाला कोर्टातून ती रक्कम पुन्हा तुमच्या खात्यावर पाठवली जाईल,’ असे सांगून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला.
यातूनच तक्रारदारांनी पैशांची जुळवाजुळव करुन संशयितांनी जे गुगल पे क्रमांक दिले होते त्यावर एकूण 5 लाख 35 हजार 599 रुपये पाठवले. यानंतर संशयितांनी तक्रारदारांची चौकशी करण्याचे नाटक केले. परत पैसे पाठवण्याबाबत विचारणा केली असता संशयितांनी टाळाटाळ केली. संबंधितांचे फोन परत लागत नव्हते. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाणे व अखेरीस सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अनोळखी दोन मोबाईल क्रमांकावरील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.