

सातारा : सातार्यात होत असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा श्री. छ. शाहू कलामंदिर येथे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी सुप्रसिद्ध लेखक व ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांनी सोमवारी सातारा पुढारी कार्यालयास सदिच्छा भेट देवून ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन केले.
सातार्यात आपलं सान्निध्य व सहवास अनेक वर्षांपासूनचा आहे. मात्र अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सातार्यात तुमचा नागरी सत्कार होत असल्यामुळे तुमच्या काय भावना आहेत, असे विचारले असता, विश्वास पाटील म्हणाले, माझं मन भरुन आलं आहे. सातार्यातील अनेक व्यक्ती, संस्था माझ्या जवळच्या असून त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. सातारा ही सुसंस्कृत व कर्तबगारीची पेठ आहे. मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भारतातील कुठल्याही शहरात होणार्या साहित्य संमेलनाचा मला अध्यक्ष केलं असतं तर जेवढा आनंद झाला नसता तेवढा आनंद सातार्यातील साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केल्यामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘झाडाझडती’ ही धरणग्रस्तांच्या जीवनावर तुम्ही लिहिलेल्या कादंबरीमागील तुमची भावना काय? असे विचारले असता विश्वास पाटील म्हणाले, ‘झाडाझडती’ या कादंबरीची बरीचशी मुळं सातार्यातील आहेत, याचा आनंद वाटतो. उपजिल्हाधिकारी म्हणून सातार्यात काम करताना त्यावेळी डॉ. सुरेश चंद्र हे जिल्हाधिकारी होते. त्यांनी माण तालुक्यात आंधळी धरणाचे काम सुरु केले होते. त्याठिकाणी वर्धमान निकम हे कम्युनिस्ट विचारांचे धरणग्रस्तांचे नेते होते. आंधळी भागात बुलडोझर लावले होते. त्यानंतर पुण्यात जिल्हा पुनर्वसन अधिकारी असताना श्रीनिवास पाटील हे जिल्हाधिकारी होते. परंतु या कादंबरीतील खैरमोडे गुरूजी हा गावच्या व्यवस्थेचा दलित नायक मला सातारा जिल्ह्यात मिळाला. कराडजवळचे सावंत गुरूजी हे गावठाणासाठी वर्षानुवर्षे लढत होते. त्यांची मंत्रालयात भेट झाली. तुम्ही मला न्याय दिला नाही तर दोन लिटर रॉकेल आणून मंत्रालय जाळून टाकीन, अशी त्यांनी मंत्र्यांना धमकी दिली. हे बळ या माणसाकडे कुठून आले? असा प्रश्न मला पडला. अनेक वर्षांपासून तो भोगत असलेल्या वेदनेनं त्याला बळ दिलं असं माझ्या लक्षात आलं. मला सातार्यात ‘झाडाझडती’चा नायक मिळाला.
केशवसुतांच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘जिकडे पहावे तिकडे मला माझी भावंडे दिसतायत,’ अशी अवस्था माझ्या मनाची इथे झाली आहे. तुम्हा सर्वांना भेटून मला आनंद होत आहे, असेही विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, निवासी संपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख मिलिंद भेडसगावकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संमेलनाध्यक्ष असलेल्या विश्वास पाटील यांचा सत्कार केला.