

कराड : तारळी धरणातील पुनर्वसित भांबे गावात महसूल विभाग, वनविभाग व भूमी अभिलेख यांनी एकत्रितपणे पायलट प्रोजेक्ट राबवत राज्यात प्रथमच पुनर्वसित गावातील 40 ग्रामस्थांची नावे सातबार्यावर आणण्याची कार्यवाही केली. गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते या ग्रामस्थांना नकाशा वाटप करण्यात आले.आ.मनोज घोरपडे यांनी सातत्याने प्रशासकीय अधिकार्यांशी या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून राज्यात पहिल्यांदाच पुनर्वसितांची नावे सातबार्यावर लागली आहेत.
गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील पुनर्वसित भांबे गावात दाखल झाले. यावेळी आ.मनोज घोरपडे, धरणग्रस्ताचे नेते डॉ.भारत पाटणकर, जिल्हा भुमी अभिलेख अधिक्षक वसंत निकम, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, कण्हेर कालवे, करावी 2चे कार्यकारी अभियंता राहुल घनवट, भूमी अभिलेखचे उप अधीक्षक प्रवीण पवार, नायब तहसीलदार महेश उबारे, मंडल अधिकारी श्रीकांत धनवडे व महसूल विभाग, वनविभाग व भूमी अभिलेखचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आ.मनोज घोरपडे, जिल्ह्यातील संतोष पाटील, डॉ.भारत पाटणकर यांच्यासह अन्य अधिकार्यांनी प्रकल्पग्रस्त भांबे पुनर्वसित गावासाठी देण्यात आलेल्या गायरान गटात जावून फलकाचे अनावरण केले. गेल्या काही महिन्यांपासून महसूल विभाग, वनविभाग व भूमी अभिलेख यांच्याकडून 40 प्रकल्पग्रस्तांची नावे स्वतंत्र पध्दतीने सातबार्यावर घेवून त्याचे नकाशे तयार करणे, पाणंद रस्ता करणे कब्जा पटी देण्यासंदर्भात कामकाज सुरू होते. या कामाचा आढावा व प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी करुन 16 हेक्टर वरील 40 प्रकल्पग्रस्तांना नकाशा वाटप केले व कब्जा पटी दिली.
तारळी धरणातील पुनर्वसित भांबे गावात महसूल विभाग,वनविभाग व भूमी अभिलेख यांनी एकत्रितपणे पायलट प्रोजेक्ट राबवत राज्यात प्रथमच पुनर्वसित गावातील 40 ग्रामस्थांची नावे सातबार्यावर येण्यासाठी कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सातत्याने प्रशासकीय अधिकार्यांशी या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून राज्यात पहिल्यांदाच पुनर्वसितांची नावे सातबार्यावर लागली आहेत.या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार मनोजदादा घोरपडे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.