

सातारा : यंदा कधी नव्हे ते मे महिन्यातच कृष्णा नदीची पातळी वाढली असून कृष्णा - वेण्णाच्या संगमावर पुरासारखी स्थिती उद्भवली आहे. येथील छत्रपती शाहू महाराजांची समाधी पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर शुक्रवारीही कायम राहिला असून पावसाळा सुरु होण्यापूर्वीच उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांत 277.7 मि.मी. पाऊस कोसळला असून या पावसाने 1971 पासूनचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. जनजीवन पूर्णत: कोलमडून पडले असून ओढे, नालेही भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मशागतीची कामे ठप्प झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मुसळधार पावसाच्या सरीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने हाहाकार उडवला आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले असून धो धो कोसळधारा कायम आहेत. चार दिवसात विक्रमी पाऊस पडला. दि. 20 मे रोजी 56.3 मि.मी, दि. 21 मे रोजी 59.5 मि.मी., दि. 22 रोजी 86.6 मि.मी. तर दि. 23 रोजी सकाळपर्यंत 75.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तर काही ठिकाणी शेतीचे बांध वाहून गेल्याने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वादळी
वार्यामुळे काही ठिकाणी अडसाली ऊस पडले आहेत. यावर्षी कधी नव्हे तो उच्चांकी पाऊस मे महिन्यात पडला आहे. शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. उन्हाळी हंगामातील भुईमूगाची काढणी सुरु होती. मात्र पावसामुळे खोळंबली आहे. काही ठिकाणी पावसामुळे शेंगांना अंकुर फुटले आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वार्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
कृष्णा, वेण्णा, उरमोडी, तारळी यासह अन्य नद्यांना पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सातारा तालुक्यातील आनेवाडी-मर्ढे जोडणार्या कृष्णा नदी पुलावरुन पुराचे पाणी गेले होते. त्यामुळे गावचा संपर्क तुटला होता. तसेच पुलावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकली होती. मात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने पुलावरील जलपर्णी हटवण्यात आली. पावसामुळे झाडे, घरांच्या भिंतीसह घरे पडझडीच्या घटना ठिकठिकाणी सुरुच आहेत. सातारा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या 24 तासात झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 34.9 मि.मी., जावली 4. 1 मि.मी., पाटण 30.8 मि.मी., कराड 33.8 मि.मी., कोरेगाव 34.7 मि.मी., खटाव 34.5 मि.मी., माण 34.3 मि.मी., फलटण 24.3 मि.मी., खंडाळा 25.9 मि.मी., वाई 35.1 मि.मी., महाबळेश्वर 55.7 मि.मी.पावसाची नोंद झाली.