

सातारा : सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) सन 2011 ते 2015 या कालावधीत कारवाया रेकॉर्डब्रेक झाल्या आहेत. या 4 वर्षामध्ये 89 सापळा (ट्रॅप) कारवाया झाल्या आहेत. तेव्हाची प्रकरणे न्यायालयात सुनावणी सुरु झाली असून आतापर्यंत 13 केसेसमध्ये शिक्षा लागल्या आहेत. यामुळे हे एक रेकॉर्ड झाले असून एसीबीचा शिक्षेचा आलेख वाढला आहे.
तत्कालीन पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, बयाची कुरळे, गोविंद ओमासे हे अधिकारी सातारा एसीबीमध्ये कर्तव्य बजावत होते. या चारही अधिकार्यांचा सातार्यातील कालावधी 2011 ते 2015 असा आहे. दहा वर्षापूर्वी या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी एक सो एक धडाकेबाज (क्लास वन) वर्ग 1 च्या 5 अधिकार्यांवर कारवाई केल्या होत्या. 2011 ते 2015 या वर्षात 89 केसेसमध्ये खासगी पंटरांसह एकूण 116 जणांना अटक करण्यात आली होती.
लोकांनी निडरपणे पुढे यावे...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आजही तक्रार करणार्यांचे प्रमाण नगण्य आहे. ‘एखाद्याच्या पोटावर पाय कशाला आणायचा?’ या मानसिकतेमध्ये लोक आहेत. वास्तवीक सरकारी कुठलाही अधिकारी, सरकारी कर्मचारी अगदी लोकप्रतिनीधीही लाचलुचपतच्या कक्षेत येतात. प्रत्येक नागरिकाला यापैकी कोणाकडे ना कोणाकडे जावे लागते. शासकीय, रीतसर कामासाठी लाच मागितल्यास कारवाई होवू शकते. यामुळे लोकांनी निडरपणे पुढे आले पाहिजे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली पाहिजे.
तहसीलदार, नगररचनाकारांना झाल्या शिक्षा..
जिल्ह्यात 2011 ते 2015 या चार वर्षाच्या कालावधीत सातारा एसीबीने वर्ग 1 च्या अधिकार्यांवर लाच मागितल्याप्रकरणी सापळा कारवाई केल्यानंतर पुढे ही प्रकरणे न्यायलयात टिकली आहेत. आतापर्यंत तहसीलदार, नगररचनाकार सारख्या दर्जाच्या अधिकार्यांना शिक्षा झाल्या आहेत. याशिवाय एकाच केसमध्ये तिघांना शिक्षा देखील लागल्या आहेत.
1064 टोल फ्री क्रमांक...
शासकीय कार्यालयात किंवा लोकप्रतिनिधीने लाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संपर्क करण्यासाठी चार मार्ग आहेत. 1064 हा टोल फ्री क्रमांक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुख्य कार्यालय असून तेथे समक्ष जावूनही तक्रार केली जावू शकते. याशिवाय लॅन्ड लाईन दूरध्वनी, ई मेल हे देखील पर्याय आहेत. दरम्यान, तक्रारदाराला एसीबी कार्यालयात जाणे शक्य नसल्यास एसीबी विभागाचे पथक थेट समक्ष तक्रारदाराकडे येवून तक्रार घेवू शकते.