Satara Crime: पाठलाग करून ॲक्टिव्हा पेटवली

पांढरवाडी येथील घटना; एकजण पोलिसांच्या ताब्यात
Satara Crime: पाठलाग करून ॲक्टिव्हा पेटवली
Pudhari
Published on
Updated on

तारळे : दारूच्या नशेत शिवीगाळ करत पाठलाग करून लोखंडी रॉडने ॲक्टिव्हा फोडली. त्यानंतर पेट्रोल टाकून ती ॲक्टिव्हा पेटवून दिली. पांढरवाडी (ता. पाटण) येथे ही घटना घडली असून, यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत विक्रम शिंदे (रा. पांढरवाडी) यांनी तारळे पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. यावरून प्रताप मुसळे (रा. पांढरवाडी) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस दूरक्षेत्र व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दि. 11 रोजी रात्री 9 च्या आसपास विक्रम शिंदे ॲक्टिव्हावरून मित्र संदेश शिंदे याच्याबरोबर तारळे येथून घराकडे दूध घेऊन निघाले होते. त्यावेळी प्रताप मुसळे हा दारू पिऊन त्याच्या घरासमोर रस्त्यावर उभे राहून शिवीगाळ करत होता. तेथून गाडी पुढे गेल्यावर प्रताप हातात चाकू घेऊन गाडीचा पाठलाग करू लागला. भीतीमुळे गाडी रस्त्यात सोडून विक्रम व त्याचा मित्र बाजूला जाऊन उभे राहिले. लगतच्या घरात धार्मिक कार्यक्रम असल्याने तेथे गावातील लोक जमले होते. तेथेही हातात चाकू घेऊन त्याने लोकांना शिवीगाळ केली. त्यावेळी लोकांनी त्याच्या हातातील चाकू काढून घेतला.

त्यानंतर प्रताप याने लोखंडी रॉडने ॲक्टिवा फोडली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढून ॲक्टिवा पेटवून दिली. त्यावेळी ग्रामस्थही हजर होते. पण प्रताप रॉड घेऊन तेथेच उभा राहून दहशत मजवत असल्याने पुढे कोणीही गेले नाही. यामध्ये गाडी जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून संशयिताला ताब्यात घेतले. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथक पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news