Satara Politics: आम्ही आता मिठी मारायलाही तयार; शंभूराज यांना चालेल का?

जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर ना. शिवेंद्रराजेंची मिश्किली
Satara Politics: आम्ही आता मिठी मारायलाही तयार; शंभूराज यांना चालेल का?
Published on
Updated on

सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पालकत्वाखाली आम्ही काम करत आहोत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीच्या एकत्रित बैठकीबाबत हस्ते-परहस्ते निरोप आले, पालकमंत्र्यांकडून थेट निरोप आला असता, तर बैठकीला गेलो असतो. आता आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायलादेखील तयार आहोत. ते आता शंभूराजेंना चालेल का?, अशी मिश्किली सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांनी सुप्त हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच जिल्हा नियोजन निधीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी प्रशासनासोबत बैठक झाली. या बैठकीला आ. मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची या बैठकीला उपस्थिती होती. ना. शिवेंद्रराजे भोसले हे लातूरला गेले असल्याने बुधवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीला ते आले नव्हते. गुरुवारी पालकमंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर पत्रकारांनी जिल्हा परिषदेतील त्रिशंकू स्थितीबाबत छेडले.

ना. शंभूराजे देसाई आणि ना. शिवेंद्रराजे भोसले हे एकत्र आल्याने उत्सुकता ताणली गेली होती. या दोघांमध्ये काय चर्चा झाली? जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत ना. शिवेंद्रराजेंची भूमिका काय? याबाबत बैठक संपताच पत्रकारांनी दोघांनाही प्रश्न विचारले. त्यावर ना. देसाई यांनी मी गेल्या दोन दिवसांपासून बोलतोय. तुम्ही आता बाबाराजेंनाच विचारा, असे सुचवले. त्यानंतर पत्रकारांनी ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, त्याला शिवेंद्रराजेंनी अतिशय दिलखुलासपणे उत्तरे दिली.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेमध्ये भाजपची भूमिका काय असणार? असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे म्हणाले, मी हात पुढे करत होतो, तुम्ही हातात घेतला नाही, असे म्हणत शंभूराजेंनी मला त्यांच्या जवळ बसवून घेतले. आता आमची मिठी मारायची तयारी आहे, मात्र, त्यांना ते चालणार आहे का? जिल्हा परिषद निवडणुकीआधी ना. देसाई यांनी बोलावलेल्या बैठकीला तुम्ही का गेला नाहीत? असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, पालकमंत्र्यांनी मला थेट निरोप दिला नव्हता. त्यांचा निरोप व्हाया-व्हाया आल्याने घोळ झाला, तेव्हा वातावरण नीट नव्हते, अशी मिश्किली ना. शिवेंद्रराजेंनी केली.

जिल्हा परिषदेच्या सत्तेत तुम्ही एकत्र येणार का? असे विचारले असता ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहे. पुढचे-पुढे ठरेल, आता पालकमंत्र्यांनी सांगायचे आणि आम्ही ऐकायचे. आमचा पक्ष आकड्याने मोठा असला तरी पालकमंत्री आमच्यापेक्षा मोठे आहेत, अशी कोपरखळी देखील ना. शिवेंद्रराजेंनी मारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news