

सातारा : किरकसाल, ता. माण येथील पाणथळीवर युरोपातील दुर्मीळ बेलन क्रेक हा पक्षी आढळला. या पक्षाचे निरीक्षण करून ते ई बर्ड या आंतरराष्ट्रीय पक्षीनिरीक्षण संकेतस्थळावर नोंद केल्यावर त्याला अधिकृत मान्यताही मिळाली आहे. या नोंदीमुळे सातार्याच्या पक्षीनिरीक्षणात एका नव्या पक्ष्याची भर पडली आहे.
बेलन्सची फटाकडी हा अत्यंत लहान आणि लाजाळू स्वभावाचा पक्षी आहे. तो सहसा पाणथळीतील दाट वनस्पतींमध्ये लपून राहतो, त्यामुळे त्याचे निरीक्षण करणे कठीण असते. हा स्थलांतरित पक्षी असून, हिवाळ्यात तो पूर्व आफ्रिका आणि दक्षिण आशिया येथे स्थलांतर करतो. तो चिखल किंवा उथळ पाण्यात चोचीच्या मदतीने अन्न शोधतो. तसेच काही वेळा डोळ्यांनी पाहूनही अन्न उचलतो. त्याचा आहार मुख्यतः कीटक आणि जलीय प्राण्यांवर आधारित असतो. सातारा जिल्ह्यात हा पक्षी पहिल्यादांच आढळून आला आहे. माण तालुक्यातील किरकसाल हे पूर्वी दुष्काळी गाव होते. या गावातील ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे केली असल्याने भूजलपातळीत चांगली वाढ झाली आहे. ग्रामस्थांनी यानंतर जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.