Madha Lok Sabha Result 2024 : रणजितसिंह की धैर्यशील? आज फैसला

Madha Lok Sabha Result 2024 : रणजितसिंह की धैर्यशील? आज फैसला
Published on
Updated on

खटाव, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नाट्यमय घडामोडींनी चर्चेत राहिलेल्या माढ्यातून कोण विजयी होणार आणि पराभवाच्या कडवट काढ्याचा घोट कुणाला घ्यावा लागणार, याचा फैसला आज होणार आहे. मनी, मसल, सत्ता, पळवापळवी, कुरघोड्यांचा बेसुमार वापर आणि शेवटी जाती-पातीच्या राजकारणाने उचल खाल्लेल्या माढ्याच्या निवडणुकीत भाजपचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील वरचढ ठरणार, याकडे मतदारसंघासह राज्याचे लक्ष लागले आहे. तुतारी घुमणार की कमळ फुलणार, माढा आणि यंदा कुणाला पाडा? या सर्वाचा फैसला दुपारपर्यंत होणार आहे.

दस्तुरखुद्द शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केल्याने तत्कालीन राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघात 2019 साली भाजपच्या खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांना अकलूजकर मोहिते पाटील यांनी निर्णायक मताधिक्य मिळवून दिले होते. गेल्या निवडणुकीनंतरच्या काही कालावधीतच निंबाळकर व मोहिते पाटलांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायच्या अगोदर दोन वर्षे धैर्यशील मोहिते पाटलांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली होती. भाजपच्या वरिष्ठांकडे त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. मोर्चेबांधणी झाली आहे, आता माघार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता.

दुसरीकडे खा. निंबाळकरांनी मोहिते पाटील वगळून मतदारसंघातील सर्वच आमदार आणि पदाधिकार्‍यांची मोट बांधून पक्ष श्रेष्ठीकडे दावेदारी पेश केली होती. भाजपनेही पहिल्याच यादीत रणजितसिंहांना लोकसभेचे तिकीट जाहीर करुन मोहिते पाटलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवली होती. अकलूजकरांना विधानपरिषदेवर दिलेली संधी, कारखाने आणि इतर संस्थांना केलेली मदत विचारात घेता त्यांचे बंड थोपवता येईल, असा भाजपाच्या वरिष्ठांचा कायास होता. त्याच वेळी मोहिते पाटील आणि फलटणकर रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंहांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करणे सुरुच ठेवले होते.

माढ्यातील दोन मोठ्या मात्तबर घराण्यांचा विरोध भाजपला हलक्यात घेऊन चालणार नव्हते. म्हणूनच देवेंद्र फडणवीसांसह संकटमोचक गिरीश महाजन यांनी टोकाचे प्रयत्न करुन मोहिते पाटील यांना थांबवण्याचे आरपारचे प्रयत्न केले होते. अजित पवार यांनीही रणजितसिहांना असलेला रामराजेंचा विरोध शमवण्याचे प्रयत्न केले होते. टोकाचे प्रयत्न करुनही भाजप आणि राष्ट्रवादीला यात यश आले नाही. होतील त्या परिणामांना सामोरे जायची सर्वांगीण तयारी करुन धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करुन रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात शड्डू ठोकला. रामराजेंनीही औपचारिकपणे स्वतः तटस्थ असल्याचे दाखवून कुटुंबीय मोहिते पाटलांच्या बाजूने निवडणूक रणधुमाळीत उतरवले होते.

रणजितसिंह निंबाळकर यांनी मतदासंघातील पाच आमदार महायुतीच्या बाजूने असल्याने सुरुवातीला निवडणूक हलक्यात घेतली होती. मात्र धैर्यशील मोहिते पाटलांनी रान उठवल्यावर आणि काही मोहरे त्यांच्या बाजूला वळवण्यात यश मिळवल्यावर हालचाली वाढवल्या. दोन्ही उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार यंत्रणा राबवली. रणजितसिंहांसाठी पंतप्रधान मोदींची सभाही झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर मंत्र्यांनी या मतदारसंघात वेळ दिला. दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवार व जयंत पाटलांसह महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी प्रचारात जान आणली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मनी, मसल, सत्ता, कुरघोड्या, पळवापळवी आणि शह काटशहाचे जोरदार राजकारण झाले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नानेही या मतदारसंघात उचल खाल्ली होती. आज माढ्यातील जनतेने कुणाला कौल दिला आहे याचा फैसला होणार आहे. माढ्याच्या निवडणूक निकालात निंबाळकर की मोहिते पाटील दिल्लीला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news