Satara politics: रामराजे विरुद्ध रणजितसिंह संघर्ष आणखी पेटणार

फलटण पालिकेचे घमासान ठरणार प्रतिष्ठेचे : अस्तित्वासाठी राजकीय रणसंग्राम
Satara politics: रामराजे विरुद्ध रणजितसिंह संघर्ष आणखी पेटणार
Published on
Updated on
पोपट मिंड

फलटण : फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली असून यावर्षीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. स्थानिक पातळीवरील सत्तेच्या लढाईने राजकीय संघर्षाचे शेवटचे टोक गाठले असून विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात न भूतो न भविष्यती असा अटीतटीचा सामना रंगणार आहे. 13 प्रभागातून 27 नगरसेवक पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब आजमावण्यासाठी अनेक इच्छुक उताविळ झालेे आहेत. संभाव्य इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी आ. रामराजे व रणजितसिंह यांनी जोरदार तयारी केली आहे. तालुक्याचे सध्याचे राजकीय चित्र पाहता राज्य शासनाच्या पाठबळाचे काटे रणजितसिंह यांच्या पारड्यात गतीने फिरत आहेत. याउलट विधान परिषदेचे माजी सभापतीपद भूषवलेल्या व विधानपरिषदेचे विद्यमान आमदार असलेल्या रामराजे यांच्यावर पक्ष व सरकार खट्टू झाले आहे. फलटण नगरपालिकेवर आ. रामराजे यांचे 30 वर्षांपासून वर्चस्व आहे. 2016 साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 17 जागा तर त्यावेळच्या राष्ट्रीय काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी रणजितसिंह हे काँग्रेसमध्ये होते. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. 30 वर्षांपासून शहरासह तालुक्याच्या राजकारणावर रामराजे यांची पक्की मांड होती.

मात्र खासदारकीच्या निवडणुकीत रणजितसिंह हे पराभूत झाले. तरीही तालुक्यात त्यांना चांगलीच आघाडी मिळाली होती. आमदारकीच्या निवडणुकीत राजे गटाचे असलेले वर्चस्व अधिकच कमी झाले. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पक्षांतरामुळे शहरात राजे गटाची मोठी पडझड झाली. सत्तेचा आशीर्वाद असलेल्या खासदार गटाकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्यामुळे इच्छुकांची संख्या त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रणजितसिंह यांचे निष्ठावान कार्यकर्ते व पक्षांतर करुन आलेले कार्यकर्ते यामुळे भाजपची ताकतही वाढली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे आमदारकी आहे. तर शिवसेना शिंदे गटही सक्रिय झाला आहे.

महायुतीची ताकद वाढली असली तरी जागा वाटप करताना रणजितसिंहांना मोठी कसरत करावी लागणार आहे. स्थानिक पातळीवर नाराजी नसली तरी राज्यपातळीवरील राष्ट्रवादी अजित पवार गटाला फलटण नगरपालिकेत अधिक जागा हव्या असणार आहेत. कारण त्यांचा आमदार या ठिकाणी आहे. त्यामुळे जागा वाटप करताना रणजितसिंह यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

फलटणमध्ये यावेळी नगरपालिकेची निवडणूक स्थानिक आघाड्या करुनच लढवली जाण्याची दाट शक्यता आहे. पक्षीय पातळीवर निवडणुका होण्याची शक्यता खूपच कमी आहे. राजे गट आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुकीला सामोरे जाणार हे स्पष्ट आहे. महायुती एकत्रित लढली तरी पक्षीय चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता कमीच असल्याने तेही स्थानिक आघाडी करुनच लढण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी असल्याने या ठिकाणी राजे गटाकडून आ. रामराजे यांचे पूत्र अनिकेतराजे हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असू शकतात. त्यांच्या विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू व नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर व नगराध्यक्षपदाचा अनुभव असलेले दिलीपसिंह भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

फलटण शहरामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, रासप, कामगार सेना तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट यांना मानणारा स्वतंत्र मतदार आहे. या पक्षांच्या भूमिकेवरही बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. इच्छुक असूनही उमेदवारी न मिळाल्यास नाराज झालेले इच्छुक कोणती भूमिका घेतात यावरही बरीच गणिते अवलंबून राहणार आहेत. तिकीट न मिळाल्यास बंडखोरी होणार का? ऐनवेळी तिसरी आघाडी निर्माण होणार? हेही पाहावे लागेल.

यावेळी प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झालेले आहेत. प्रभाग रचना व मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर इच्छुकांचे घर एका प्रभागात तर दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीत नाव, त्याचबरोबर विकास कामे केलेला बहुतांश भाग दुसऱ्या प्रभागात अशी स्थिती झाल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. तर काहीजणांना याचा फायदा होताना दिसत आहे. सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अनेक नेत्यांना त्यांच्या स्वतःच्या वॉर्डात आरक्षणाचा फटका बसला आहे. आपल्याला नाही तर कुटुंबातील महिलेसाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. या वेळच्या निवडणुकीमध्ये अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. सध्या उमेदवार निवडीसाठी दोन्ही गटाकडून मुलाखती तंत्राचा अवलंब सुरू आहे. अनेक ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. मात्र दोन्ही गट अत्यंत सावधपणे पावले उचलत आहेत. आपला कोणताही समर्थक नाराज होणार नाही यासाठी काळजी घेतली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news