

फलटण : ना. जयकुमार गोरे आणि माझ्यात काही वैयक्तिक वैर नाही. गोरेंना असं वाटतंय की मीच त्यांच्याविरुद्ध सगळं करतोय. देव त्यांना सद्बुद्धी देवो. माझ्या शुभेच्छा त्यांना आहेत. त्यांनी त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा, सत्तेचा वापर गोरगरिबांची कामे करण्यासाठी करावा. माझं वाढलेलं वय पाहता सल्ला देण्याचा मला निश्चित अधिकार आहे. त्यावेळेस फासेच असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल अडी निर्माण झालीय. त्यांना सांगण्याचाही मी प्रयत्न केला होता. योग्य वेळी मी त्यांना पुन्हा सांगेन. आज मी माझ्या तोंडाला जरा सेन्सॉरशिप लावलीय, योग्य वेळी सेन्सॉरशिप उठेल, त्यावेळी सगळं बोललं जाईल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी केले.
कोळकी (ता. फलटण) येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, जि. प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, बाळासाहेब शेंडे, धनंजय पवार, रेश्माताई भोसले, कोळकी ग्रामपंचायत सरपंच अपर्णा पखाले व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
आ. रामराजे पुढे म्हणाले, ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वाने एकही कार्यकर्ता निर्माण करता आला नाही, ते ठेकेदारांना बिलं काढणार नाही, पोलिसांना सांगून आत टाकेन, तुझा आगवणे करीन अशा धमक्या देऊन प्रशासकीय दहशत दाखवून कार्यकर्ते फोडत आहेत. अशांचा तिरस्कार करायला मतदार घाबरतात याचे मला आश्चर्य वाटतं. आमच्या पूर्वजांनी आम्हाला जातीपातीचे राजकारण शिकवलं नाही. जातीपातीच्या राजकारणाचे संस्कार आमच्यावर नाहीत. मी कधीही जातीचे राजकारण करणार नाही. पैसेवाला व गरजू या दोनच जाती आहेत. गरीब गरजूंसाठी राजकारण केलंय, यापुढेही त्यांच्यासाठीच राजकारण करत राहणार आहे.
आमच्या जीवात जीव असेपर्यंत फलटणच्या जनतेकडे जातीच्या मताचे गट्टे म्हणून कधीही बघणार नाही. ती आमची जनता आहे याच भावनेने त्यांच्याकडे बघत राहणार. आजवर कार्यकर्त्यांना सांभाळण्यात आमचा जीव गेला आता ती चूक आम्ही करणार नाही. यापुढे मतदारांच्या भविष्यासाठीच आमचं राजकारण राहील. कार्यकर्त्यांना सर्व काही दिले. पण स्वार्थासाठी ते सोडून गेले. जे कार्यकर्ते सोडून गेलेत तो आमचा अपमान नव्हे तर आमच्या शब्दावर ज्यांनी त्यांना मतं दिली. त्यांना मोठं केलं. त्या जनतेचा तो अपमान आहे. तीच जनता याचा निश्चितच हिशेब केल्याशिवाय राहणार नाही. कृष्णा खोरे लवादाचा अभ्यास केल्यामुळे आपल्या जिल्ह्याचे 120 टीएमसी पाणी मी वाचवू शकलो याचं मला समाधान आहे.
संजीवराजे म्हणाले, कोळकीने माझी ओळख निर्माण केली आहे. हे मी कधी विसरणार नाही. सौर उर्जेवर आधारित नळ पाणीपुरवठा योजना सुरू करणारी कोळकी राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. कोळकीच्या मतदारांनी सतत पाठराखण केली आहे. विरोधकांकडून व्यावसायिकांवर दबाव टाकला जात आहे. तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. रास्त व कायदेशीर व्यवसाय बंद पडू देणार नाही. कार्यकर्त्यांनो, विकास कामाची चिंता करू नका. आ. रामराजे यांच्या शब्दाला राज्यात आजही किंमत आहे. सत्ता असो- नसो जनतेत राहून जनतेची विकास कामे करीतच राहणार. तिथे कोणी विकास कामात आडवा आला तर त्याला आडवा करण्याची ताकद आमच्यात आहे हे विसरू नका, असा निर्वाणीचा इशाराही संजीवराजे यांनी विरोधकांना दिला.
माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या सिक्युरिटीबद्दल बोलताना आ. रामराजे म्हणाले, अहो, धमक्या येतात मला. खरं तर मला सिक्युरिटीची गरज आहे. पण मी आपला फिरतोय गाडीतून. यांना पहिल्यांदा आर. आर. पाटलांनी सिक्युरिटी दिली. ते विरोधात होते तेव्हा. आता ती सिक्युरिटी वाढत वाढत गेलीय. आख्खं फलटण तालुक्याचे पोलीस दल फिरू द्या त्यांच्या मागं, अशी उपासात्मक टीकाही त्यांनी केली.