

फलटण : माजी खासदारांना किती डोकं दिलं आहे? त्यांची बुद्धीमत्ता किती आहे, हे मला माहिती नाही. पैसे कोठून आणायचे? बँकांतून कसे कोट्यवधी रुपये काढायचे? हे जे काही त्यांच शास्त्र आहे ते अजब आहे. म्हणून मी त्यांना मल्ल्या म्हणतो. मल्ल्यानेही अशाचपद्धतीने बँका लुबाडल्या. त्यांच्या कारखान्याबाबत आमच्याकडे पण बरच काही आहे. पण काही बोललो का? मला काही बोलायच नाही. दुसरे तिसरे हे आसूवाले आहेत. हा विषारी नाग आम्ही गेली ६० वर्षे पोसला, असा खोचक टोला आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी विरोधकांना पत्रकार परिषदेत लगावला.
श्रीराम कारखान्याच्या भवितव्यावरून फलटण तालुक्यात राजकीय वातावरण तापले असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सातारा जि.प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे उपस्थित होते.
रामराजे यांनी फलटणच्या जनतेसाठी माझा लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील, असे सांगितले. ते म्हणाले, लोक साथ देवो किंवा न देवो, जनहितासाठीचा संघर्ष थांबवणार नाही. माझे वय ७९ वर्षांचे असले तरी लोकांच्या हितासाठी कार्यरत राहणे ही आमच्या घराण्याची संस्कृती आहे आणि ती आम्ही कधीही सोडणार नाही.
आ. रामराजे म्हणाले, आमचा कोणाशीही वैयक्तिक विरोध नाही. मात्र दुसऱ्यांचे ओरबडून घेण्याच्या प्रवृत्तीला आमचा ठाम विरोध आहे. विरोधकांनी पाठीमागून राजकारण करण्याऐवजी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरावे. आमच्या पूर्वजांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या संस्था वाचवणे आणि दहशतमुक्त फलटण घडवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. कारखाना बंद पडावा, यासाठी विरोधकांकडून खालच्या पातळीचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगत, ‘केवळ पक्षीय राजकारणातून विरोधकांच्या हाती कारखान्याचे भवितव्य सोपवू नका. यात शेतकरी भरडला जाईल आणि सरकारची बदनामी होईल,’ असा स्पष्ट संदेश आपण मुख्यमंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्याच्या कार्यपद्धतीला विरोध करणारे प्रल्हादराव साळुंखे-पाटील, शिवरूपराजे खर्डेकर व विश्वासराव भोसले यांच्यावरही जोरदार टीका केली. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे म्हणाले, आ. रामराजे यांच्या आवाहनाला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक सभासद शेअर्सची थकीत रक्कम भरत आहेत. विरोधकांना खरोखरच कारखाना सुरू करायचा असेल, तर त्यांनी राजकारण बाजूला ठेवून भागीदारी तत्त्वावरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. श्रीराम कारखाना सहकारी तत्त्वावरच सुरू झाला असून भविष्यातही सहकारी तत्त्वावरच चालवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.