

फलटण : एकेकाळी फलटणमध्ये गटातटाचं राजकारण राज्यात प्रसिद्ध होते. रणजितसिंह आणि माझ्यात संघर्ष आहे असं आपण म्हणता? मग आम्ही एकमेकांच्या कॉलरी धराव्यात अशी अपेक्षा आहे का? आमच्यात भांडणं नाहीत मतभेद आहेत. मतभेद आणि भांडण यात मोठा फरक आहे. राजकारणात मतभेद राहिले तरच लोकशाही टिकेल. प्रत्येकाला स्वतःचा विचार असतो. महत्त्वाकांक्षा असते. त्यानुसार प्रत्येकजण काम करतो. भांडताना कुठे थांबायचं हे आम्हा दोघा निंबाळकरांना चांगलं समजतं, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व सौ. इंदूमती मेहता या उभयतांच्या नागरी सत्काराच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, युवक मित्र ह.भ.प बंडातात्या कराडकर, आ. सचिन पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सातारा जि. प. चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र पळणीटकर, विश्वजीतराजे ना. निंबाळकर, डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, दिलीपसिंह भोसले, नानासाहेब इवरे, काशिनाथ शेवते, युवराज शिंदे, पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, सुभाष भांबुरे, शेतकरी संघटनेचे शंकर गोडसे उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
आ. रामराजे म्हणाले, लोकशाही मानणार्यांना संघर्ष आवडला पाहिजे. संघर्षाला सात्विकता व माणुसकीची जोड मिळायला हवी. संघर्षाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणसाचं हित असावं. प्रगल्भ पत्रकारितेची समाजाला गरज आहे. पत्रकारांनी वास्तव मांडावे स्वतःच्या पोटाचा नव्हे तर सर्वसामान्यांच्या भुकेचा विचार करून लेखणी चालवावी. पत्रकारांच्या लेखणीमध्ये प्रचंड ताकद आहे. भल्याभल्यांना पत्रकाराच्या लेखणीने नागवले आहे, सत्ताच्युत केले आहे. जे आहे ते ‘तेच’ पत्रकारांनी परखडपणे लिहिलं तरच राजकारणी सुधारतील, असेही ते म्हणाले.
रणजीतसिंह ना. निंबाळकर म्हणाले, फलटणच्या सर्वांगीण विकासामध्ये अरविंद मेहता यांच्या पत्रकारितेचे योगदान विसरता येणार नाही. मेहता हे पत्रकारच नव्हे तर सल्लागारही आहेत. माझ्या संघर्षमय जीवनातील ते माझे राजकीय गुरू आहेत. राजकारणात यश अपयश चढ-उतार असतात. पण राजकारणात सल्लागार चांगला असणे महत्त्वाचा आहे. संगत कुणाची आहे हेही महत्त्वाचं आहे. अडचणीच्या वेळी मेहता यांनी दिलेल्या सल्ल्याचा मला निश्चितच फायदा झाल्याचे ते म्हणाले.
हरीश पाटणे म्हणाले, फलटणच्या राजकीय पर्यावरणाचं स्वास्थ्य ठीक करण्याची किमया अरविंद मेहता यांच्यामध्ये आहे. त्यामुळेच दोन कट्टर राजकीय विरोधक असलेले निंबाळकर एकाच व्यासपीठावर आज आपणाला दिसत आहेत. हे काम फक्त अरविंद मेहताच करू शकतात. जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र करण्यात अरविंद मेहता यांचे मोठे योगदान आहे. फलटणच्या पत्रकारितेला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम त्यांनी केलं. अरविंद मेहता म्हणजे फलटणच्या पत्रकारितेचा ज्ञानकोश आहेत. तरुण पत्रकारांना मेहता यांचे मार्गदर्शन यापुढेही लाभदायक ठरेल.
वसंत भोसले म्हणाले, जनभावना निर्माण करण्याचं काम पत्रकारितेचं असतं प्रगल्भ माहितीपूर्ण पत्रकारिता कमी होत चालली आहे. राजकीय लोक होते कुठे? आहेत कुठे? हे ही आज कळत नाही. सगळा बेरंग झाला आहे. काळाचा महिमा आहे. वेगानं मूल्य घसरत चाललं आहे. राजकारण बदलत आहे. वर्तमानपत्रात छापून येणार सत्य असतं हा पूर्वीचा समज आज संपत चालला आहे. सूत्रसंचलन आनंद पवार, सतीश जंगम यांनी केले. युवराज पवार यांनी आभार मानले.