

सातारा : अन्न सुरक्षा विभागाने रामनगर, ता. सातारा येथे छापेमारी करत तब्बल 281 किलो वजनाचा 5 लाख 58 हजार 988 रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एक संशयित मात्र लघुशंकेचा बहाणा करत तेथून पळाला.
याप्रकरणी संजय राठोड व सागर संजय राठोड (वय 32, दोघे रा. रामनगर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी त्या अन्न सुरक्षा अधिकारी रूपाली खापणे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई 17 नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रामनगर येथे माऊली बिल्डींगमध्ये एका खोलीत गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने छापा टाकला. यावेळी खोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा, सुगंधी मसाला होता. या साठ्याबाबत, गुटखा कुठून आणला, खरेदीची बिले?
याबाबत विचारणा केली असता संशयितांनी उत्तर दिले नाही. यामुळे अन्न सुरक्षा विभागाने गोडावूनमध्ये असलेल्या गुटख्याची तपासणी केली. यावेळी तो 281 किलो वजनाचा व साडेपाच लाख रुपये किंमतीचा असल्याचे समोर आले. त्यानुसार घटनास्थळाचा पंचनामा करुन सातारा तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.