

कोरेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलले जाणार असल्याचा प्रचार पूर्णतः खोटा आहे. कोणत्याही परिस्थितीत संविधान बदलले जाणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मला केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली, हा सर्व समाजाचा सन्मान आहे. रहिमतपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.
रहिमतपूर येथे समता स्तंभाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. मनोजदादा घोरपडे, नगराध्यक्ष सौ वैशाली निलेश माने, उपनगराध्यक्ष केतन माने, रिपाइंचे प. महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड, चित्रलेखा माने कदम, सुनील माने, नगरसेविका, सौ किरण तुषार चव्हाण,निलेश माने, सुरज गायकवाड जगदीश गायकवाड, सुवर्णाताई चिपाडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना. आठवले यांनी समता स्तंभास अभिवादनही केले. दरम्यान, या प्रसंगी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी समता स्तंभाच्या सुशोभीकरणासाठी साठ लाख रुपयांची तरतूद केली असून त्याचे भूमिपूजन डॉ. आठवले यांच्या हस्ते झाले.
रामदास आठवले म्हणाले, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही ही त्याची भूमिका होते. आपण सर्वांनी मिळून पुढे जाणे गरजेचे आहे. आ. मनोज घोरपडे यांनी मोठं स्मारक उभण्यासाठी नियोजन करावे त्यासाठी मी 50 कोटी रुपये सरकारच्यावतीने या ठिकाणी आणू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे तीनदा मुख्यमंत्री होते, तर देशाचे पंतप्रधानपद भूषविण्याचा त्यांना तीन वेळा सन्मान मिळाला आहे, तो केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आहे. या संविधानाला बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही या देशांमध्ये लोकशाही आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले लोकशाहीचा संविधान मजबूत आहे. या संविधानाला जो कोणी हात लावेल त्याला आपला समाज टराटरा फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. हे संविधान बदलणे एवढे सोपे काम नाही त्यामुळे संविधान बदलाच्या त्या अफवा आहेत. आपली चळवळ व्यापक आहे. मी जय भीम पासून कधीही दूर जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.