

कराड : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे तमाशा कलावंत आणि फडमालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सात महिन्यांचा अखंड तमाशा सीजन असणारे तंबूतील तमाशा फड सध्या पावसामुळे ठप्प झाले आहेत.
तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडेसह नितीनकुमार बनसोडे करवडीकर, रघुवीर खेडकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, मालती इनामदार नारायणगावकर, हरीभाऊ बडे नगरकर आणि आनंद लोकनाट्य जळगावकर यांचे फड सध्या सुरू असले तरी मागील चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एकही खेळ होऊ शकलेला नाही.
यामुळे या तमाशा मंडळांचे कलावंत मिळेल त्या ठिकाणी मुक्कामाला थांबत आहेत. दररोजच्या सादरीकरणावरच उपजीविका अवलंबून असल्याने या कलावंतांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. फडमालकही आर्थिक विवंचनेत असून तमाशा कलावंतांवर आर्थिक संकट कोसळले आहे. राज्य सरकारने किंवा स्थानिक प्रशासनाने या पारंपरिक कलावंतांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तमाशा प्रेमींकडून केली जात आहे.