

खटाव : श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित रथोत्सव आणि यात्रा प्रदर्शनाचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. यात्रेकरुंच्या विक्रमी गर्दीचा उच्चांक आणि दररोज होणारी कोट्यवधींची उलाढाल अचंबित करणारी ठरत आहे. कालचा सुपर संडे तर रेकॉर्डब्रेक गर्दीचा ठरला. पुसेगावात पाय ठेवायलाही जागा नव्हती. नाताळच्या सुट्ट्यांमुळे आणखी आठवडाभर यात्रेचा बहर राहणार असल्याने येणारा रविवारही यात्रेकरुंसाठी परवणीच ठरणार आहे.
दि. 18 डिसेंबर रोजी श्री सेवागिरी रथोत्सव भाविकांच्या रेकॉर्डब्रेक उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक, आध्यात्मिक, कला, क्रिडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. रथोत्सवाला एकाच दिवसात आठ ते दहा लाख भाविकांनी हजेरी लावली होती. एकाच दिवशी रथावर 87 लाखांच्या देणग्या अर्पण करण्यात आल्या होत्या. युवा महोत्सव, बैलगाडी शर्यती, कबड्डी, क्रिकेट, कुस्त्या, व्हॉलीबॉल स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवामहोत्सवात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवताना स्पर्धकांनी सादर केलेला कलाविष्कार हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन गेला.
रथोत्सवानंतर पुढील प्रत्येक दिवशी पुसेगावनगरी पुन्हा एकदा उच्चांकी गर्दीने फुलून जात आहे. यात्रेत मेवा मिठाई, सौंदर्यप्रसाधने, खेळणी, कपडे, भांडी, दुचाकी, चार चाकी गाड्यांसह ट्रॅक्टर, शेती औजारे, शोभेच्या वस्तूंची शेकडो दुकाने थाटण्यात आली आहेत. सुप्रसिद्ध जिलेबी, फरसाणसह विविध चटकदार पदार्थांची खाऊ गल्ली यात्रेकरुंचे आकर्षण ठरत आहे. गगनचुंबी आकाश पाळण्यांसह विविध करमणुकीची साधने बाळगोपाळांसह थोरा मोठ्यांनाही भुरळ पाडत आहेत. प्रत्येक दिवशी यात्रेत कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळत आहे. यंदा भरलेल्या बैलबाजारालाही चांगला प्रतिसाद मिळून खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
रविवारी पुसेगाव गर्दीने ओव्हर फ्लो झाले होते. नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्याने आणखी आठवडाभर येणाऱ्या रविवारपर्यंत श्री सेवागिरी यात्रेत कोट्यवधींची उलाढाल सुरूच राहणार आहे. यात्रेकरुंना करमणूक आणि खरेदीचा आनंद घेता येणार आहे.