Nitin Gadkari: पुणे-सातारा प्रवास तासात

ना. नितीन गडकरी : स्व. आबासाहेब वीर सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे वितरण
Nitin Gadkari: पुणे-सातारा प्रवास तासात
Published on
Updated on

भुईंज : पुणे ते सातारा या प्रवासाबाबत तुम्हाला अनेक वर्षे त्रास झाला आहे, याची मला जाणीव आहे; पण आता पुणे शहरात फ्लायओव्हरसाठी, बायपाससाठी आणि सातारा-पुणे या महामार्गासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा आराखडा केला असल्याने सातारा-पुणे प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होईल, अशी ग्वाही देशाचे रस्ते विकासमंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिली.

भुईंज येथील किसनवीर कारखाना कार्यस्थळावर ना. नितीन गडकरी यांना देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार विधान परिषदेचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री आणि किसनवीर कारखाना अध्यक्ष मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सदाशिव सपकाळ, ॲड. उदयसिंह पाटील, प्रमोद शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणे गरजेचे आहे. फक्त साखर उत्पादनातून नफा मिळविणे आता अशक्य आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवून आगामी काळात साखर कारखानदारांनी स्वतःचे इथेनॉल विक्री पंप सुरू करणे आवश्यक असल्याचे ना. नितीन गडकरी यांनी सांगितले.

मकरंद पाटील म्हणाले, नितीन गडकरी यांना पुरस्कार देणे हे आमचे भाग्य आहे. देशात आणि राज्यात राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम करणारा नेता ही त्यांची ओळख आहे. गडकरींना पुरस्कार दिल्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे. किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचा कारभार केला जात आहे. अडचणीत असलेला हा कारखाना आम्ही बाहेर काढून शेतकऱ्यांना चांगला दर देत आहोत. भविष्यातही कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हिताचा कारभार केला जाईल.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, नितीन गडकरी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते संभाळले आहे. माझ्यासमोर हा आदर्श आहे. सातारा जिल्ह्याच्या जनतेच्या महायुतीच्या मंत्र्यांकडून खूप अपेक्षा आहेत. गडकरी यांनी सातारा जिल्ह्यावर विशेष लक्ष द्यावे. सातारा जिल्ह्यातील बायपास पाचगणी-महाबळेश्वरसाठी स्वतंत्र रस्ता आणि आम्हा आमदारांच्या मतदारसंघातील रस्त्यासाठी केंद्र स्तरातून मदत करावी, त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र स्तरावरून सहकार्य करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news