Superstition Fraud: पुण्यात बुवा, भक्त साताऱ्यात; कर्नाटकातून ऑनलाईन पूजा

अंधश्रद्धेच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक
Superstition Fraud
Superstition Fraud
Published on
Updated on

सातारा : लग्न जमत नाही, नोकरीत यश मिळत नाही, घरातील आजारपण, आर्थिक अडचणी, कोर्ट-कचेऱ्या तसेच कौटुंबिक वाद अशा विविध समस्यांनी त्रस्त तरुणांना हेरून अंधश्रद्धेच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात समोर आला आहे. साताऱ्यातील काही एजंट तरुणांना पुण्यातील बुवांकडे घेऊन जात असून, समस्या दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडून तब्बल २५ हजार रुपये घेतले जात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली आहे.

पुण्यातील संबंधित बुवा प्रथम तरुणांकडून त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्यांची सविस्तर माहिती घेतो. त्यानंतर तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल आणि त्यानंतर मनात असलेली इच्छा पूर्ण होईल, अशी भूलथाप दिली जाते. आर्थिक अडचणीत असलेले तरुणही या आश्वासनाला भुलून पैसे उभे करत असल्याचे समोर आले आहे. पूजेचे साहित्य खरेदी करण्याच्या नावाखाली संबंधित तरुणांकडून २५ हजार रुपये घेतले जातात. त्याची पावतीही दिली जाते.

मात्र, प्रत्यक्ष पूजा पुण्यात केली जात नाही. कर्नाटकातून ऑनलाइन पूजा केली जाणार असल्याचे तोंडी सांगितले जाते. पूजा करण्यासाठी तीन महिन्यांनी तुमचा नंबर येईल, असेही संबंधितांना सांगण्यात येते. काही तरुणांना व्हिडिओ कॉल करून ऑनलाइन पूजा सुरू असल्याचे दाखविले जाते. मात्र, संबंधित बुवाने दिलेल्या आश्वासनानुसार कोणताही परिणाम झाला नसल्याचे एका तरुणाने सांगितले. त्याचे लग्न ठरले नाही किंवा घरातील आजारपणाची समस्याही दूर झाली नाही.

साताऱ्यासह पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि सांगली येथूनही तरुण-तरुणी संबंधित बुवाकडे येत असल्याचे सांगितले जाते. बुवाला भेटण्यासाठी आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. प्रत्यक्षात पूजा नेमकी कुठे, कोणाकडून आणि कशा पद्धतीने केली जाते, याची माहिती संबंधित भक्तांनाही दिली जात नाही. नागरिकांनी कोणत्याही धार्मिक विधीच्या नावाखाली पैसे मागितले जात असल्यास त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news