

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावरील शेंद्रे ते कागल या रस्त्यावर सुरू असलेल्या सहापदरीकरणाच्या कामामुळे प्रवाशांचे रोजचेच मरण होत आहे. वाहतूक कोंडीमुळे जीव घायकुतीला आला आहे. याविरोधात दै. ‘पुढारी’ने आक्रमक प्रहार करताच त्याची तिन्ही मंत्र्यांनी लागलीच दखल घेतली. सोमवारी जिल्हा प्रशासनाची तातडीची बैठक घेत या मंत्र्यांनी प्राधिकरणाची खरडपट्टी काढत अधिकार्यांना धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत 10 दिवसांत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करा. वाहतूक कोंडी होऊ देऊ नका; अन्यथा कारवाई करू, असा इशारा तिन्ही मंत्र्यांनी दिला.
शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहापदरीकरणामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि वाई ते पोलादपूर रस्त्यावर होणार्या वृक्षतोडीविरोधात दै. ‘पुढारी’ने लढा उभारला आहे. दोनच दिवसांपूर्वी ‘शेंद्रे-कागल रस्त्यावर प्रवाशांचे रोजचेच मरण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तात सातारा जिल्ह्याला चार मंत्री असून जनतेचे असे हाल होत असतील तर जनतेने कोणाकडे न्याय मागायचा? असा परखड सवाल विचारण्यात आला होता. जनता संतापली असल्याची जनभावनाही दै. ‘पुढारी’ने मांडली होती. या वृत्ताची तातडीने दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकार्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला बोलावले. या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना धारेवर धरले.
शेंद्रे-कागल रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. 2022 पासून काम सुरू असून हे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे. प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानीमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सर्वच रस्ता ताब्यात घेऊन काम केले जात असल्याने चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेकजण जखमीही झाले आहेत अशी भावना बैठकीत मांडण्यात आली.
शेंद्रे ते कागल रस्त्यांचे काम सुरु आहे. या कामाच्या अनुषंगाने सेवा रस्त्यावर ठेवलेली विविध यंत्रे काढून सेवा रस्त्यावरील वाहतूक विना अडथळा होईल, याची दक्षता घ्या. सध्या पावसामुळे महामार्गावर पाणी येत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गालगतची गटारे साफ करा. वाहतुकीदरम्यान वाहनधारकांना कोणतीही अडचण होणार नाही, याची रस्ते विकास महामंडळाने खबरदारी घ्या, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.
महामार्गावरील तुंबलेली गटारे खुली करा. रस्ते विकास महामंडळाने महामार्गावरील गस्त वाढवावी, रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मित्रांची नेमणूक करा, माजी सैनिकांना विनंती केल्यास, तेही रस्ते विकास महामंडळाला मदत करतील, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी केल्या. ज्या ठिकाणी पाणी साठून राहते, तेथील चिखल काढून टाका, पाणी साठून देऊ नका. पावसाळा आल्याने ही कामे तातडीने हाती घ्या. 10 दिवसांत हे काम झाले पाहिजे, अशी तंबी ना. मकरंद पाटील यांनी दिली.