महामार्गावरील कोंडी; रोजच प्रवाशांच्या बोकांडी

शेंद्रे ते नागठाणेदरम्यान तीन तास चक्काजाम : वाहनचालकही हैराण
Pune-Bangalore highway
पुणे-बेंगलोर महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी.
Published on
Updated on

नागठाणे : पुणे-बेंगलोर महामार्गावर धिम्या गतीने चाललेल्या सहापदरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. 1 मे व शुक्रवारची सुट्टी टाकून अनेकांनी सलग सुट्ट्यांचा लाभ घेतल्याने महामार्गावर गुरूवारी वर्दळ होती. यामुळे खिंडवाडीपासून अतीतपर्यंत सातारा-कराड लेनवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. वाहनधारक व प्रवाशांना तीन तास ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे पुणे-मुंबईतून कराडच्या दिशेने निघालेल्या वाहनधारकांसाठी 1 मेच्या सुट्टीचा दिवस ‘कोंडी डे’ ठरला.

चाकरमान्यांना सलग सुट्ट्या मिळाल्या त्यातच शाळांनाही उन्हाळी सुट्ट्या लागल्याने पुणे, मुंबईस्थित मंडळी कराड, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, तसेच कोकणातील आपल्या मूळगावी जाण्यासाठी वाहने घेऊन निघाली होती. मात्र, खिंडवाडी ते अतित या गावांच्या हद्दीमधील 14 किलो मीटरअंतरातील महामार्गावर वाहतूक कोंडीत ही वाहने अडकून पडली. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले. अतित, माजगाव, नागठाणे, बोरगाव, भरतगाव, वळसे, शेंद्रे या प्रत्येक गावात जाण्यासाठी महामार्गावरून सोयीचा रस्ता देण्याचे नियोजन पूर्णपणे फसल्याचे या वाहतूक कोंडीमुळे निदर्शनास येत आहे. परिणामी या सर्व गावांच्या महामार्गावरील चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. रणरणत्या उन्हात ही वाहने महामार्गावर थांबली होती. या वाहनांमध्ये बसलेले प्रवासी अक्षरश: भाजून निघाले. काही वाहनधारक तर वाहने जिथल्या तिथे ठेवूनच झाडांच्या सावलीच्या सावलीत जाऊन बसले.

दरम्यान, नागठाणे व बोरगाव या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब होऊन बनली आहे. बोरगाव पोलीस प्रशासनाने या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. दिवसभर नागठाणे चौकात बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी उभे होते. त्यांनी या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही ठिकाणी आत जाण्याचे पर्यायी मार्ग व्यवस्थित नसल्याने तसेच योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकरचे नियोजन फसल्यामुळे प्रवाशांना रोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

लोकप्रतिनिधी कुठे लपून बसलेत?

पुणे-बंगळूर महामार्गावर शेंद्रेपासून अगदी कराडपर्यंत दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होवू लागली आहे. प्रवाशांना वाहने सोडून मैलोन्मैल पायपीटही करावी लागत आहे. या ज्वलंतप्रश्नी माध्यमांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मात्र, लोकप्रतिनिधी व तथाकथीत स्वयंघोषित नेत्यांना काही याचे सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व पर्यायी उपाययोजना करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. जनता भरडून निघत असताना नेतेगिरी करत फिरणारे तसेच फुटकळ कारणांसाठीही आंदोलन करणारे स्वयंघोषित नेते कुठल्या बिळात लपून बसले आहेत? ते या समस्येवर आवाज का उठवत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे.

बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकवा

नागठाणे चौकात साताराहून कराडकडे जाणार्‍या मार्गिककेवरून आत उजव्या बाजूला नागठाणेकडे जाणारा मार्ग 300 मीटर पुढे असताना अनेक दुचाकीस्वार चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडून जात असल्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी प्रशासनाने या बाजूकडून चुकीच्या पद्धतीने गाड्या घालणार्‍या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news