

सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक खपाचे, प्रथम क्रमांकाचे, सर्वांत प्रभावशाली व जिल्ह्यातील जनतेचे लाडके वृत्तपत्र असलेल्या ‘पुढारी’चा बुधवार, दि. 1 जानेवारी रोजी 86 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने होत असलेल्या ‘पुढारी’ वर्धापनदिन स्नेहमेळाव्याचा रंगारंग सोहळा गोडोलीतील हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत रंगणार आहे.
‘नववर्षाचे स्वागत, ‘पुढारी’ सोबत’ हे वर्षानुवर्षाचे समीकरण यंदाही कायम राहणार आहे. वाचकांच्या आशीर्वादाच्या भावबळावर दै. ‘पुढारी’ बुधवारी 87 व्या वर्षात पदार्पण करत आहे. राष्ट्रभावना हृदयात ठेवून पत्रकारितेची मशाल सदैव तेवत ठेवत ‘पुढारी’ सातारा जिल्ह्याचे काळीज पान ठरला. सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून अन्याय अत्याचाराविरोधात कठोर प्रहार करत संकटाच्या काळात ‘पुढारी’ सातारा जिल्ह्यातील जनतेच्या सोबत राहिला. सामान्य जनतेसाठी ‘पुढारी’ करत आलेले ‘पुढार’पण महाराष्ट्राने पाहिले आहे. जनता जनार्दनाशी अलौकिक नाते ठेवून ‘पुढारी’ परिवार सातारा जिल्ह्यातील आपले अढळस्थान अबाधित ठेवत पुढे निघाला आहे.
बुधवारी 86 वा वर्धापन दिन साजरा करत 87 व्या वर्षात पदार्पण करत आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी दि. 1 जानेवारी 2025 या पहिल्याच दिवशी सायंकाळी 6 ते 8 यावेळेत राजधानी सातार्यातील ऐतिहासिक गोडोली तलावानजिक हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर हा स्नेहमेळा होत आहे. तत्पूर्वी दै.‘पुढारी’ सातारा कार्यालयात सकाळी दै. ‘पुढारी’चे संस्थापक, ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
दरम्यान, सायंकाळी संस्कृती लॉनवर होणार्या स्नेहमेळाव्याला लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, वाचक, विक्रेते, जाहिरातदार आणि हितचिंतक आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. नववर्षाची पहिली सायंकाळ व ‘पुढारी’चा वर्धापनदिन हा अनोखा क्षण साजरा करण्यासाठी ‘पुढारी’च्या या स्नेहमेळाव्याला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन ‘पुढारी’ परिवाराने केले आहे. दरम्यान, या निमित्त दै. पुढारी कराड कार्यालयातही दै. ‘पुढारी’चे संस्थापक, ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.