

सातारा : दै. ‘पुढारी’ने वाचकांना दिलेल्या मान्सून धमाका लकी ड्रॉची सोडत सातारा नगरपालिकेच्या हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. या स्पर्धेत सहभागी वाचकांना हमखास बक्षीसे देण्यात आली असून लकी ड्रॉमध्ये कोडोली, ता. सातारा येथील गोरखनाथ जाधव व नेहरूनगर, ता. कराड येथील उदय पवार हे पहिल्या नंबरच्या अॅक्टिवाचे मानकरी ठरले आहेत.
दरम्यान, दै. ‘पुढारी’ मान्सून धमाका सोडतीमध्ये बक्षीसासाठी नाव निघताच वाचकांमध्ये एकच उत्साह संचारला. स्वरसाधना प्रस्तुत हिंदी व मराठी गाण्यांच्या मैफिलीत, भारावलेल्या वातावरणात आणि तुडुंब गर्दीच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. लकी ड्रॉमधून दै. ‘पुढारी’च्या वाचकांवर बक्षीसांचा वर्षाव झाला.
‘पुढारी’ मान्सून धमाकाचा लकी ड्रॉ मंगळवारी सातारकरांच्या अभूतपूर्व गर्दीत काढण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख दोन विजेत्यांसह वॉशिंग मशीन, स्मार्ट टी.व्ही. पैठणी, ट्रॅव्हल बॅग, कॉपर बॉटम हंडी सेट, मल्टी पर्पज किचन प्लेट डीश कॉर्नरअशी अनेक बक्षिसे देण्यात आली. यावेळी सातारा प्रांताधिकारी आशिष बारकूल, माजी नगराध्यक्ष व जनता बँकेचे व्हाईस चेअरमन विजय बडेकर, दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, निवासी संपादक हरीष पाटणे, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भेडसगावकर, वृत्तपत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, उपाध्यक्ष ताजुद्दीन आगा, सचिव गणेश पवार, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते राजाभाऊ खांडेकर, ‘पुढारी’चे कोल्हापूरचे वितरण व्यवस्थापक उत्तम पालेकर उपस्थित होते. सोडत समारंभाच्या प्रारंभी ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
दै. ‘पुढारी’ मान्सून धमाका योजनेतील व्दितीय क्रमांकाचे बक्षीस असलेल्या वॉशिंग मशीनचे विजेते सातारा शहरातून सैनिकनगर येथील प्रवीण सोपान देशमुख, उत्तेकरनगर येथील अश्विनी अशोक उटकुर तर कराडमधून मिनाज युसूफ शेख विजेते ठरले. तृतीय क्रमांक बक्षीस असलेल्या स्मार्ट टिव्हीचे सातारा शहरातून ऋषीकेश अरुण निकम कोपर्डे, सध्या राहणार सातारा, सुनील अप्पासाहेब मोहिते ज्ञानगंगा अपार्टमेंट, सातारा तर कराड शहरातून मंगल रामचंद्र औटे, मंगळवार पेठ, अस्मिता दादासो पाटील, काले हे विजेते ठरले.
त्यानंतर पुढील बक्षीसांच्या भाग्यवान विजेत्यांसाठीही ड्रॉ काढण्यात आला. कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना आशिष बारकूल म्हणाले, वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या माध्यमातून घडामोडी समजत असतात. दै. ‘पुढारी’ने मान्सून धमाकाच्या माध्यमातून वेगळेपण दिले आहे. आम्ही लहान असताना अशा वृत्तपत्रांच्या योजनांमध्ये सहभाग घेत होतो. तेव्हापासूनच वाचनाची आवड निर्माण झाली. आजही वृत्तपत्र वाचनानेच दिवसाची सुरुवात होते. पेपर वाचल्याने वाचनाची आवड निर्माण होते. समाजातील घडामोडी समजतात. माझ्या जीवनाचा पेपर एक भाग झाला असून त्यात ‘पुढारी’ अग्रस्थानी आहे. वृत्तपत्र वाचणे गरजेचे आहे. सध्या डिझिटल जमाना सुरु असला तरी पेपरचे महत्व आजही अबाधित असल्याचे त्यांनी सांगितले.
हरीष पाटणे म्हणाले, दै. ‘पुढारी’ने वाचकांसाठी हमखास बक्षीस योजना आणली. त्यात कोट्यवधींची बक्षीसे वाचकांना मिळाली. ऐतिहासिक सातार्यात वृत्तपत्रावर अतिक्रमण करण्याचे प्रसंग घडले. मात्र, असे प्रसंग थोपवून दै. ‘पुढारी’ हा नंबर वन राहिला आहे. सातारकरांनी अतिक्रमण करणार्यांना उत्तर देत ‘पुढारी’ ला एक नंबरवर ठेवले आहे. वृत्तपत्र घराघरात पोहचवण्यात वितरक व अंक विक्रेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्यानेच हा उपक्रम यशस्वी झाला आहे. सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी दै. ‘पुढारी’ कायम वाचकांसोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आभार जीवनधर चव्हाण यांनी मानले. सूत्रसंचलन दुर्गा बोकील यांनी केले. सोडत समारंभप्रसंगी सातारा शहर वृत्तपत्र विक्रेते अभिजीत पडलल्लू, हमीद खान, भास्कर भोरे, हिंदूराव शिंदे आदी उपस्थित होते.
सोडतीसाठी प्रचंड उत्साह अन् प्रतीक्षा...
दै.‘पुढारी’ मान्सून धमाका लकी ड्रॉ सोडतीसाठी वाचकांमध्ये प्रचंड उत्साह होता. अनेक दिवसांपासून या लकी ड्रॉची प्रतीक्षा होती, ती या सोडतीने संपणार होती. वाचकांच्या उपस्थितीमुळे सभागृह तुडुंब भरले होते. अनेक वाचक वेळेआधीच सभागृहात दाखल झाले होते. सदाबहार गीतांच्या मैफीलीसह मुख्य कार्यक्रमाची वाट पाहत होते. मान्यवर स्टेजवर येताच टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले. लकी ड्रॉमध्ये आपले नाव ऐकण्यासाठी सर्वांनी कान टवकारले होते. एकएक बक्षीस जाहीर होत होते, तशी उपस्थितांमध्ये उत्साह वाढत होता. टाळ्यांच्या कडकडाटात विजेत्यांचे अभिनंदन केले जात होते.