

सातारा : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व गोविंद टुर्स ॲण्ड ट्रॅव्हलतर्फे दै. ‘पुढारी’च्या कस्तुरींसाठी रॉयल हैद्राबाद सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत कस्तुरींनी रामोजी फिल्मसिटी, बिर्ला मंदिर, ऐतिहासिक गोवळकोंढा फोर्ट, चौमहल्ला पॅलेस व चार मिनार या ऐतिहासिक वास्तूंना भेटी दिल्या. या सहलीत कस्तुरींनी धम्माल मस्तीसह पर्यटनाचा आनंद लुटला.
हिवाळ्यात गुलाबी थंडीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व गोविंद टुर्स ॲण्ड ट्रॅव्हलतर्फे सातारा-हैद्राबाद-सातारा असे दोन रात्री व तीन दिवसांची ट्रीप आयोजित केली होती. यामध्ये सातारा ते सातारा एसी स्लीपर बस प्रवास, फिरण्यासाठी बस, थ्रीस्टार हॉटेलमध्ये मुक्काम, डीजे पार्टी, नाष्टा, जेवन, साईट सीनचे तिकीटसह सर्व खर्च समाविष्ट होता. या सहलीमध्ये महिलांनी हैद्राबाद शहरातील विविध ऐतिहासिक वास्तू संग्रहालय, लेझर शो सह हुसेन सागर लेकमध्ये बोटिंगचा आनंद लुटला.
रामोजी फिल्म सिटीतील विविध भव्य महालांच्या प्रतिकृती पाहून कस्तुरी भारावून गेल्या. तसेच लुबिनी पार्क, लाड बझार, सालारजंग म्युझियम, मक्का मस्जिद आदी ठिकाणच्या पर्यटनाबरोबरच डीजेपार्टीत धम्माल केली.