

सातारा : शेंद्रे-कागल रस्त्यावर सहापदरीकरणाच्या कामाचा फज्जा उडाल्याने वाहनचालक, प्रवाशांना मोठ्या कोंडमार्याला सामोरे जावे लागत होते. दै. ‘पुढारी’ने आवाज उठवल्यानंतर याची दखल घेत जिल्ह्यातील मंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या कामाचे ‘पोस्टमार्टम’ केले होते.
दहा दिवसांत वेगाने काम करुन मार्गावर वाहतूक कोंडी दूर करण्याच्या सूचना करत मंत्र्यांनी महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित ठेकेदारांचे कान पिळले होते. दै. ‘पुढारी’च्या हिसक्याने महामार्गाचे काम आता दोरीत सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच सेवा रस्त्यांवरील मोठाले गतिरोधकही काढले जात आहेत. दै. ‘पुढारी’ने आवाज उठवल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे ते उंब्रजपर्यंत ठिकठिकाणी खड्डे आणि रस्ते वळवण्यात आल्याने वाहतूक ठप्प होत असल्याचे दै. ‘पुढारी’ने समोर आणले होते. सेवा रस्त्यांची झालेली चाळण, वेळोवेळी होणारी वाहतूक कोंडी, मुख्य रस्त्याचे अपूर्ण काम, सेवा रस्त्यांवर झालेला राडारोडा, अरुंद रस्त्यावर होणारे अपघात तसेच महामार्गालगत शेती असलेल्या शेतकर्यांचे हाल याबाबत दै. ‘पुढारी’ने आवाज उठवला होता.
दै. ‘पुढारी’च्या वृत्तांची दखल घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. शिवेंद्रराजे भोसले व ना. मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करुन महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांचे प्रतिनिधी यांना सूचना केल्या होत्या. जिल्हा प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाने तातडीने काम हाती घेऊन सेवा रस्त्यावरील खड्डे मुजवायला घेतले. कामासाठी लागणारी मशिनरीही महामार्गावर आणली आहे. तसेच मुख्य लेनच्या डांबरीकरणाचे कामही आता हाती घेतल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर वाहने बंद पडून वाहतूक कोंडी होण्याची समस्या वाढल्याने महामार्गावर नादुरुस्त वाहने न आणण्याची वाहनचालकांनी खबरदारी घेतली पाहिजे. आपले वाहन सुस्थितीत आहे की नाही, हे तपासूनच शेंद्रे ते उंब्रज महामार्गावरुन प्रवास करावा, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या ठिकाणी वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून अडथळे दूर करण्यात आले आहेत. रस्ते अरुंद असल्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी वाहतूक धीम्या गतीने सुरू राहणार आहे, वाहन चालकांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम अदानी आणि ग्लोबल कंपनीने घेतले आहे. या दोन कंपन्यांच्या माध्यमातून गेल्या सप्टेंबर 2022 पासून काम सुरू आहे. शेंद्रे ते उंब्रज या पट्ट्यामध्ये सर्वाधिक पाच उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. दोन्ही कंपन्यांचे नाव मोठे आहे. त्यामुळे काम करत असताना ‘नाव मोठं अन् लक्षण खोटं’ असं करु नका. आपल्या ‘ग्लोबल-अदा’ कामातून दिसू द्या, अशी अपेक्षा प्रवासी वर्ग व्यक्त करत आहे.