Satara News | सुपेकरांविरुध्द सातार्‍यात निघाला होता मोर्चा

वासनाकांड प्रकरण तपासाबाबत संशयकल्लोळ : वादग्रस्त कारकिर्दीला उजाळा
Satara News |
Satara News | सुपेकरांविरुध्द सातार्‍यात निघाला होता मोर्चाFile Photo
Published on
Updated on

सातारा : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सासरच्या मंडळींना बंदुकीचे लायसन देण्यासाठी त्यांना सहकार्य केल्याने चर्चेत आलेले पोलिस अधिकारी डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात 2001 साली सातार्‍यात मोर्चा निघाला होता. पिक्चरमध्ये काम देतो, असे सांगून महिला, युवतींवर पांढरपेशींनी अत्याचाराचे वासनाकांड केले होते.

या ‘नाजूक प्रकरणाचे’ तपासी अधिकारी त्यावेळचे सातारचे डीवायएसपी डॉ. जालिंदर सुपेकर होते. मात्र त्यांच्या तपासाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांची सातार्‍यातील कारकिर्द वादग्रस्त राहिली. सातारा पेन्शनरांचा जिल्हा म्हणून ख्याती पावलेला. 2000 साली तर सातारा एकदम शांत. सातार्‍यात त्यावेळी चित्रपट नगरीची सर्वांनाच भुरळ होती.

‘हिरवा शालू’ नावाचा पिक्चर काढायचा असल्याचे सांगून हिरॉईन, साईड हिरॉईन यासाठी महिला, युवतींची गरज असल्याची टूम निघाली. 25 वर्षापूर्वी सातार्‍यात सहजासहजी नटी म्हणून कोणी तयार होईल, तसे कोणी आहे, अशी परिस्थिती नव्हती. याचाच पिक्चरचे डोक्यात खुळ गेलेल्यांनी ‘बाजार’ केला. नटीसाठी ‘मुलाखत’ द्यावी लागते असे सांगून सातार्‍यात ‘पाखरं’ उठवण्याचा सपाटा सुरु झाला. मुलाखतीच्या गोंडस नावाखाली ‘दलालांना’ चलती आली.

पिक्चरचं शुटींग प्रामुख्याने सातारा शहर परिसरात होणार असल्याने माळरानात, हॉटेलात इच्छुक नट्यांना बोलावणं झालं. पिक्चरात काम मिळेल, नशीब फळफळेल, अशी अपेक्षा नट्यांना झाली. मात्र नटी काही केल्या फायनल होत नव्हती. कारण या प्रक्रियेत संधीसाधूनी अनेका पिडीतांचे शोषण करुन त्यांची अक्षरश: फिरवाफिरवी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पिक्चरचं काम सुरु होत नव्हते. नट्यांसाठी ‘चाचपणीची’ प्रक्रिया वासनाकांडापर्यंत गेल्याने पिक्चरचं काम ‘जाणूनबुजून’ रेंगाळत ठेवले गेले. हिरवा शालू भलतीकडेच भरकट गेल्याने पिक्चरमधील एका साईड हिरोला वाटल्याने त्याने अंकुश ठेवायचा निर्धार केला. यातूनच सातार्‍यातील वासनाकांडाच भूत सातारकरांच्या मानगुटीवर बसले.

पिक्चरच्या नावाखाली चार ते पाच महिलांचे शोषण झाल्याचा बभ्रा झाल्याने प्रकरण सातारा शहर पोलिस ठाण्याच्या दरबारात आलं. गुन्हा दाखल झाला. संशयित आरोपींमध्ये रथी-महारथींची नावे येवू लागली. तसे सर्वांचे धाबे दणाणले. प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने हे प्रकरण तत्कालीन डीवायएसपी जालिंदर सुपेकर यांच्याकडे तपासाला आले. तपासामध्ये प्रामुख्याने गर्भश्रीमंत तसेच पांढरपेशांना ‘चौकशी’ या गुळगुळीत नावाखाली पोलिसांकडून बोलवणे झालं. यामुळे तपास भरकटला आणि सातार्‍याची पुरती बदनामीच अधिक वाढत गेली. पोलिस तपास योग्य होत नसल्याने समस्त सातारकरांनी याच पोलिस अधिकारी डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध नोंदवला होता.

अब्रुचे खोबरं नको...

सातार्‍यातील वासनाकांडचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी पोलिसांनी लिस्ट काढली होती. प्रकरण आपल्यापर्यंत येवू नये. आपण अडकू नये, यातून बाहेर कसे पडता येईल, यासाठी व्यवसायिक, उद्योजक, रथी-महारथींची धडपड सुरु झाली. अब्रुचे खोबरं व्हायला नको, यासाठी पोलिसांच्या रडारवरील भागडबाजांनी रात्री-अपरात्री लपून-छपून पोलिसांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. यातूनच मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news