Niranjan Takle | छत्रपतींची परंपरा प्राणापलीकडे जाऊन जपू : निरंजन टकले

सत्याची बाजू घेवून लिहिणारे साहित्यिक दिसत नाहीत
Niranjan Takle
Niranjan Takle | छत्रपतींची परंपरा प्राणापलीकडे जाऊन जपू : निरंजन टकले Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांची सर्व धर्म-जातींना बरोबर घेऊन जायची परंपरा मोडणे हे मनुवाद्यांचे पहिले टार्गेट आहे. पण छत्रपतींची परंपरा जपणे हे पहिले टार्गेट विद्रोहीसह सर्वांचे आहे. आपण प्राणापलीकडे जाऊन छत्रपतींची परंपरा जपूया. शेतकऱ्यांची दुःखं, स्त्रियांच्या प्रश्नांवर सत्याची बाजू घेऊन लिहिताना अभिजन वर्गातील साहित्यिक दिसत नाहीत, असे मत ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक निरंजन टकले यांनी मांडले.

सातारा येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ‌‘घालमोडे दादांचे साहित्य संमेलन व आमची भूमिका‌’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर होते. यावेळी उपराकार लक्ष्मण माने, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष धनाजी गुरव, ॲड. सुभाष पाटील, हभप डॉ. सुहास महाराज फडतरे, ॲड. वर्षा देशपांडे, गणेश भिसे, प्राचार्य डॉ. अरुण गाडे, ॲड. राजेंद्र गलांडे, ॲड. दयानंद माने, डॉ. प्रशांत पन्हाळकर, नारायण जावळीकर उपस्थित होते.

निरंजन टकले म्हणाले, सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी त्यांच्या लेखनात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा दाखला दिला. छत्रपतींच्या वारसदारांनी विश्वास पाटील यांना याचा जाब विचारायला हवा होता तर तेच स्वागताध्यक्ष झाले आहेत. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील हजारो शाळा बंद करून भावी पिढीचे शिक्षण सरकारने बंद केले आहे. याबद्दल या तथाकथित साहित्यिकांनी लेखन केले आहे काय? आजच्या साहित्यिकांनी संविधानिक कर्तव्य बजावत वैज्ञानिक दृष्टिकोन जपला पाहिजे, ते होत नाही. मराठी शाळा व भाषांच्या लढ्यात साहित्यिक, कलावंत उतरत नाहीत. मुलं मराठी शिकलीच नाहीत तर तुमची पुस्तकं कोण वाचणार, चित्रपट कोण पाहिलं? असा परखड सवाल देखील निरंजन टकले यांनी केला.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, विद्रोही परंपरा ही बुद्ध, चार्वाक, संत नामदेव, संत तुकाराम, महात्मा फुले, संत गाडगेबाबा, कबीर यांची आहे. या महामानवांची विद्रोही परंपरा विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुढे चालवत असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. धनाजी गुरव यांनी प्रास्तविक केले. यावेळी आगामी विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन निर्धाराने व उत्साहाने यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला. सूत्रसंचलन मिनाज सय्यद यांनी केले. विजय मांडके यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news