

सातारा : गुणवत्ता डावलून प्रवेश प्रक्रिया राबवणार्या मुंबई विभागापुरतीच इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवावी. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी तसेच पालकांचा गोंधळ उडण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना कॉलेजचा प्राधान्यक्रम निवडताना अडचणी येणार आहेत. पालकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
विद्यार्थी व पालक हिताचा विचार करुन सातारा जिल्ह्यात अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली आहे.
गुणवत्ता डावलून प्रवेश प्रक्रिया राबवणार्या मुंबई विभागापुरतीच इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवणे आवश्यक असताना सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अशी प्रेवश प्रक्रिया राबवू नये. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास ऑगस्ट-सप्टेंबर महिना उजाडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना खाजगी क्लास लावावा लागेल. त्यातून पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.
विद्यार्थी व पालकांच्या हिताचा विचार करता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त्यांच्यादृष्टीने गैरसोयीची असल्याने शासनाने सातारा जिल्ह्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया न राबवता ती स्थगित ठेवावी, अशी मागणी सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केली आहे.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. सुनील शिंदे, कार्याध्यक्ष दशरथ जाधव, प्रा. एस. बी. पवार, प्रा. पी. व्ही. बोराटे, प्रा. हणमंतराव मांडके, प्रा. संजय पाटील, प्रा. सौ. मनीषा पाटील, प्रा. एम. बी. कुमठेकर, प्रा. एस. डी. माने, प्रा. एम. डी. ढमाळ आदि पदाधिकारी उपस्थित होते.