लिंब : पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्याजवळील वीरमाडे (ता. वाई) गावच्या हद्दीत मुंबईतून पाटणकडे जाणार्या खासगी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने मोठे नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच चालकाने वेळीच बस सर्व्हिस रोडवर घेत बसमधील आयआयटीच्या विद्यार्थ्यांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत बसचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, एसएन ट्रॅव्हल्स गोरेगाव-मुंबई कंपनीची मिनी बस (एमएच 48 सीक्यू 3073) ही मुंबईतून आयआयटीमधील विद्यार्थ्यांना घेऊन पाटणकडे निघाली होती. बस पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्याजवळ वीरमाडे गावच्या हद्दीतून जात असताना बसच्या मागील बाजूस शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे चालकाला लक्षात येताच त्याने बस महामार्गावरून सर्व्हिस रोडवर घेत थांबवली आणि सर्व 32 विद्यार्थ्यांना तत्काळ खाली उतरवले. त्यानंतर काही वेळातच बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला.
आगीची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व भुईंज पोलिसांनी तत्काळ आगीची माहिती सातारा व वाई अग्निशमन विभागाला दिल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. यावेळी भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि गर्जे व कर्मचारी तसेच महामार्ग पोलिसांनी वेळीच दखल घेऊन उपाययोजना राबवल्याने मोठा अनर्थ टळला. बसला लागलेल्या आगीबाबत चालक मुहंमद शेख (रा. नालासोपारा) यांनी फिर्याद दिली आहे. याची भुईंज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार ज्ञानदेव राजे करत आहेत.
दरम्यान, आयआयटीमधील 32 विद्यार्थी हे सुझलॉन या पवनचक्की कंपनीकडे अभ्यास दौर्यासाठी आले होते. प्रवाशी बसला आग लागल्यानंतर अडचणीत आलेल्या आयआयटी विद्यार्थ्यांना पोलिसांनी दुसर्या खाजगी बसमधून पाटणकडे अभ्यासदौर्यासाठी पाठवून दिले.