

सातारा : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसोबत निवडणूक लढण्यासंदर्भात बोलणी केली जातील. सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर काँग्रेस स्वतंत्र लढेल, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष चिन्हावर लढला आहे. पक्ष चिन्हाव्यतिरिक्त इतर कुठल्याही चिन्हावर पक्षाचे उमेदवार लढणार नाहीत. मात्र महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यासोबत बोलणी सुरू होतील. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाईल.
जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व आहे. काँग्रेसला मानणारे असंख्य कार्यकर्ते पक्षासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या पंजाच्या चिन्हावरच लढल्या जातील. मात्र जागा वाटपामध्ये जर सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा विचार करेल, असेही चव्हाण म्हणाले.