

कराड : महाराष्ट्राच्या विधानसभेचा लागलेला निकाल अनपेक्षित होता. 2024 च्या लोकसभा ते विधानसभा निवडणुकी दरम्यान 4-5 महिन्याच्या कालावधीत नवीन मतदारांची संख्या वाढली आहे. या प्रक्रियेत दुबार, तिबार मतदारांची नावे यादीत असताना निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बोगस मतदार वाढीची प्रक्रिया आयोगाने राबविली.
तसेच मतदानाच्या आकडेवारीत सुद्धा वाढलेल्या टक्केवारीबाबत कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडून दिले गेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र निवडणुकीत बोगस मतदान व वाढलेली टक्केवारीबाबत निवडणूक आयोगाची प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मुंबई येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, याआधी अनेक निवडणूका आम्ही लढवल्या आहेत. यंत्रणेचा अशाप्रकारे गैरवापर कधीही होत नव्हता. पण सत्तेत आल्यावर भाजपने सर्व सरकारी यंत्रणा सत्तेच्या गुलाम केल्या आहेत. याबाबतच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखातून वस्तुस्थिती मांडली आहे.
निवडणूक येतात जातात त्यामध्ये जय-पराजय होत असतो पण निवडणूक प्रक्रियेमध्ये पक्षपातीपणा करून निकाल वळविण्याची चुकीची पद्धत महाराष्ट्र निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच नोंद झाली. राहुल गांधींच्या लेखाने महाराष्ट्र निकालाबाबत पुन्हा एकदा निरीक्षण नोंदविले गेले. इव्हीएमबाबत आरोप केला जातो कि, ते काँग्रेसने आणले. पण निवडणूक प्रक्रिया सुरळीत तसेच जलद पार पडली जावी याउद्देशाने इव्हीएम आणले गेले. पण त्या तंत्रज्ञानाचा गैरवापर भाजपकडून सत्ता काबीज करण्यासाठी केला जात आहे, हे लोकशाहीला घातक आहे.
राहुल गांधींच्या मते 12 हजार बूथमध्ये अशी नावे वाढली आहेत आणि त्यामुळे 85 मतदार संघ असे आहेत जिथे भाजपचा याआधी पराभव झाला होता तिथे आता त्यांचा विजय झाला आहे, अशी आकडेवारी त्यांनी दिली आहे. पण मुळात यामध्ये मुद्दा काय आहे तर निवडणूक आयोगाने दुबार, तिबार नावे नोंदवली जी बोगस आहेत. आमचा आग्रह आहे की निवडणूक आयोगाने डी डुप्लिकेशनचे सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रातील प्रत्येक मतदार संघातील यादी तपासली पाहिजे. दुबार-तिबार मतदार शोधून त्यांची नावे काढली पाहिजेत.
मॅच फिक्सिंग करता अंपायर फिक्स करावा लागतो आणि तो भाजपने कसा फिक्स केला ही बाब राहुल गांधी यांनी लेखात मांडले आहे. निवडणूक आयुक्त निवडण्याची प्रक्रियाच भाजपने निवडणुकीआधी बदलली होती. त्या प्रक्रियेला आम्ही त्यावेळीसुद्धा विरोध केला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यामुळे अंपायर जर पक्षपाती असेल तर तो न्याय कसा देईल हे सर्वाना ज्ञात आहेच. असेही मत यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षाने याबाबत एक निर्णय घेतला कि, जे उमेदवार पराभूत झाले आहेत त्यांनी आपल्या मतदार संघातील निकाला विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पाहिजे. जवळपास 100 च्या वर पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. कारण काही मुद्दे आम्हाला तिथे मांडायचे आहेत. आम्हाला त्यामध्ये न्याय मिळेल असं वाटत नाही, कारण निवडणूक याचिकेचा निकाल सरकार कधीही लावू देत नाही. तरी आम्हाला त्याचा फायदा होईल कि नाही माहित नाही. पण निवडणूक प्रक्रिया तरी सुधारेल अशी अपेक्षा आहे.