

कराड : निवडणूक निकाल अनपेक्षित लागला आहे. त्यामुळे या निकालाविषयी विचारमंथन सुरू असून याबाबत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीने तक्रार करण्याबाबत विचार सुरू आहे. वरिष्ठांकडून तशा सूचना करण्यात आल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कराड येथे दैनिक ‘पुढारी’च्या वर्धापन दिनानिमित्त कार्यालयामध्ये ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, अजितराव पाटील-चिखलीकर, अक्षय सुर्वे, अमोल जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तशा घटना ही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे विकास कामे, निधी हा मुद्दा या निवडणुकीमध्ये बाजूला पडल्याचे दिसून येत आहे. लोकसभेमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळते आणि विधानसभेमध्ये मात्र पराभवाला सामोरे जावे लागते. याबाबत महाविकास आघाडी म्हणून तिन्हीही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून तक्रार करण्याबाबत विचार सुरू आहे.
निवडणुकीमध्ये पराभव झाला असला तरी एक लाखाहून अधिक मतदारांनी मला मतदान केले आहे. त्यांच्यासाठी व एकूणच कराडच्या विकासासाठी यापुढेही प्रयत्न करत राहणार आहे. कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी मी नेहमी सक्रिय असणार आहे. मुख्यमंत्री असताना काही लोकांवर जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. त्यावेळेला मी जिल्ह्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्याचा फटका मला अलीकडच्या काही दिवसांमध्ये बसला आहे. ज्यांच्या वरती जिल्ह्याची जबाबदारी दिली तेच लोकं नंतर माझ्यापासून लांब गेले आहेत. मुख्यमंत्री असताना माझ्याबरोबर होते त्यांना मी संपूर्णपणे ताकद दिली; परंतु मी स्वतः लक्ष घातले नाही. यापुढे भविष्यात असे होणार नाही. मी स्वतः लक्ष घालून कार्यकर्त्यांना पदाधिकार्यांना ताकद व पाठबळ देणार आहे. भविष्यात होणार्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याबाबत विचार केला जाईल. त्यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची ही भूमिका महत्त्वाची ठरेल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये एकत्रित लढणे गरजेचे आहे. राज्यातील वातावरण बघून सरकार राज्यातील निवडणुका टप्प्याटप्प्याने घेईल. त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांचा संपूर्ण फोकस मुंबईवरती राहणार आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील मत्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण भयानक आहे. त्यातच बीड जिल्ह्यात आज दुसरी एक घटना घडल्याचे समजते. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून बीडमधील दहशत कोणामुळे निर्माण झाली आहे, याचा तपास यंत्रणेने शोध घेणे गरजेचे आहे, असेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.