Dr. D.Y. Patil : डी. वाय. पाटील यांच्या आठवणींचा फोटोसंग्रह प्रकाशित करा : पृथ्वीराज चव्हाण

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी
Dr. D.Y. Patil : डी. वाय. पाटील यांच्या आठवणींचा फोटोसंग्रह प्रकाशित करा : पृथ्वीराज चव्हाण
Published on: 
Updated on: 

कराड : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. शिक्षण, समाजकारणत आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी केलेले योगदान कायम स्मरणात राहील. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ते खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी होते, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कोल्हापूर येथे डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी त्यांचे चिरंजीव आमदार बंटी पाटील ऊर्फ सतेज पाटील तसेच संजय पाटील यांची भेट घेऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्‍हाण यांच्‍यासोबत सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील, कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबुराव पवार, कराड शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रदीप जाधव यांच्यासह कराड तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी असलेल्या अनेक दशकांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा दिला. कोल्हापूर येथील हॉटेल सयाजीच्या उद्घाटनावेळी डॉ. पाटील यांच्यासोबत झालेल्या आठवणी त्यांनी सांगितल्या. तसेच दिल्लीतील विविध भेटी आणि चर्चांबरोबरच डॉ. डी. वाय. पाटील यांनी बिहार व त्रिपुरा राज्याचे राज्यपाल असताना झालेल्या भेटींच्या आठवणीही त्यांनी जागवल्या.

"डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी आमच्या कुटुंबाचे अनेक दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने वैयक्तिकरीत्याही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सतेज पाटील, संजय पाटील तसेच संपूर्ण पाटील कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे," असे चव्हाण यांनी सांगितले.

डॉ. डी. वाय. पाटील यांना मानणारा मोठा लोकवर्ग महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर आहे. या सर्वांशी संपर्क साधून डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासोबतचे छायाचित्रे, आठवणी आणि त्यांच्या कार्याशी संबंधित प्रसंग संकलित करून एका फोटो संग्रहाचे प्रकाशन करावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार सतेज पाटील यांना केली. डॉ. पाटील यांच्या कार्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा फोटोसंग्रह महत्त्वाचा ठरेल, असेही चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news