

सातारा : राज्यातील गडकिल्ल्यांना पूर्व परिस्थितीत आणण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या आराखड्यानुसार काम सुरु असून गडकिल्ले सुरक्षित व त्यांना वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. रायगड किल्ल्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था व समाजातील दानशूर व्यक्तींची मदत घेऊन शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन प्राधान्याने करणार असल्याची ग्वाही माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील वाघनखं व शिवकालीन वस्तूंच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक प्रविण शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शंकर माळवदे, विकास गोसावी, धनंजय जांभळे, पंकज चव्हाण, रेणू येळगावकर, सुनिशा शहा, वनिता पवार उपस्थित होते.
ना. आशिष शेलार म्हणाले, मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सातार्यात आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्श आणि पराक्रमाचा आशीर्वाद घ्यायचा अशा ठिकाणी यायचे ठरवले होते आणि ते आज खरे झाले. ऐतिहासिक वाघनखांचे प्रदर्शन संपूर्ण राज्यभर असून त्याचे दर्शन आज घेतले आहे. यातून मला प्रेरणा मिळाली आहे.
राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांना त्यांच्या उत्तम स्थितीत आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार मंत्री असतानाच चालना मिळाली आहे. तोच आराखडा पुढे घेऊन जाऊन महायुती सरकारमध्ये आपल्या प्रेरणादायी गडकिल्ले सुरक्षितता, वैभव परत आणणे यादृष्टीचा कार्यक्रम सुरु आहे. रायगड, प्रतापगड येथे प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा उर्वरित आराखडा तयार करून उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी लागणार निधी कमी पडू देणार नाही. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह सातारकरांना बरोबर घेऊन हा संग्रहालयाचा कार्यक्रम पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रतापगड किल्ल्यावर निकृष्ट काम सुरु आहे याबाबत विचारले असता ना. शेलार म्हणाले, प्रतापगड किल्ल्यावर जे काम सुरु आहे त्याबाबत चौकशी केली जाईल. कोणत्याही प्रकारचे निकृष्ट किंवा अपेक्षित आहे त्यापेक्षा वेगळे काम सुरु असल्यास ते थांबवले जाईल. मी याबाबत स्वतः लक्ष घालीन वेळ पडल्यास चौकशी समिती नेमली जाईल, असे त्यांनी सांगितले.