सातारा : दै. ‘पुढारी’ने सामाजिक भूमिकेतून विवाहसंस्था व कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने सोमवारी ‘विवाहित स्त्री-पुरुषांचे धूम मचाले’ व ‘मोबाईलवेडे गुंतले; अनैतिकतेत फसले’ हे वृत्त व केस स्टडी प्रसिद्ध केली. या दोन्ही वृत्तांचे सर्वच सामाजिक स्तरातून जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, समाजशास्त्राचे अभ्यासक, सजग असलेले ‘पुढारी’चे वाचक यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दै.‘पुढारी’ने ही सामाजिक चळवळ अशीच पुढे घेऊन जावी, कुटुंब व समाजव्यवस्थेेचे नैतिक अधिष्ठान भक्कम व्हावे, अशी अपेक्षा वाचकांनी व्यक्त केली आहे.
शिवथर (ता. सातारा) येथील विवाहितेची अनैतिक संबंधातून हत्या झाली होती. या घटनेने जिल्ह्यातील समाजमन अक्षरश: अस्वस्थ झाले. स्त्री, पुरुष पळून जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचे दुरगामी परिणाम होवू लागले आहेत. नैतिकतेची जागा अनैतिकता घेऊ लागल्याने दै. ‘पुढारी’ने या सामाजिक विषयात लक्ष घातले. या गंभीर व नाजूक विषयावर ‘पुढारी’ने आसूड ओढायचा ठरवले. विवाहसंस्था, कुटुंब व्यवस्था नुसती टिकली पाहिजे नव्हे तर ती वाढली पाहिजे, नैतिकतेचे धडे कुटुंबाकुटुंबामध्ये गिरवले जावेत, या हेतून गेले आठ दिवस टीम ‘पुढारी’ कामाला लागली. आठ दिवसांमध्ये जी माहिती हाती आली ती हादरवणारी, डोक सुन्न करणारी होती. समाजात आणि सातारसारख्या ठिकाणी हे घडत असल्याने ‘असल्या भानगडी’ची चर्चा झाली पाहिजे. चुकीच खूळ हद्दपार झालं पाहिजे, ते थांबले पाहिजे या भूमिकेतून कटू पण सत्य असलेल्या विषयाचे शिवधनुष्य ‘पुढारी’ने हाती घेतले.
सोमवारी सकाळी वाचकांच्या हाती दै. ‘पुढारी’चा अंक येताच एकच चर्चा झाली. ‘विवाहित स्त्री-पुरुषांचे धूम मचाले, मोबाईलवेडे गुंतले; अनैतिकतेत फसले’ हे वृत्त व केस स्टडी याचा शब्द न् शब्द वाचकांनी वाचून काढत उस्फुर्त प्रतिक्रीयांना मोकळी वाट करुन दिली. अनेकांनी स्वत:हून प्रतिक्रीया पाठवल्या तर अनेकांनी फोनवरुन भावना, मत व्यक्त केले. दै. ‘पुढारी’ने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करुन कौतुक केले.
गेल्या पाच वर्षांपासून सोशल मीडियामुळे बालपणीचे मित्र, मैत्रिणी संपर्कात येऊ लागले आहेत. आपण ज्या शाळेत, महाविद्यालयात शिकलो त्या प्रती कृतज्ञेतीची भावना व्यक्त होणे गैर नाही; मात्र संपर्काच्या माध्यमातून त्यातून भलते-सलते काही घडणार नाही, हे पाहणे महत्वाचे आहे. यामुळे गेट टूगेदर करताना सामाजिक भान विसरणार नाही. गेट टूगेदर भरकटणार नाही ही सर्वानीच खबरदारी घेणे गरजेचे बनले असल्याचे मत अनेकांनी ‘पुढारी’कडे व्यक्त केले.