

प्रतापगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेला प्रतापगड किल्ला आता ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील होणार आहे. ‘मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया’ या संकल्पनेतून भारत सरकारने युनेस्कोकडे पाठवलेल्या 12 किल्ल्यांच्या यादीत प्रतापगडचा देखील समावेश करण्यात आल्याचे वृत्त येताच किल्ल्यावर आनंदोत्सवाला बहार आला.
या जागतिक मानांकनामुळे किल्ल्याचा कायापालट होऊन छत्रपती शिवरायांचा महापराक्रमी इतिहास वर्षानुवर्षे नव्या पिढ्यांच्या स्मृतीपटलावर कोरला जाणार आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहेच. याशिवाय भविष्यातील विकास, पर्यटन, संरक्षण आणि स्थानिक रोजगारासाठी महत्त्वाची संधी ठरणारी आहे. जागतिक मान्यतेमुळे या किल्ल्याला पुन्हा शिवकालातील ऐतिहासिक वैभव प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवप्रेमींना आता या किल्ल्याचा नवा लूक पाहण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
किल्ले प्रतापगड याला जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. किल्ले प्रतापगड आजपर्यंत हा महाराष्ट्रातील राबता गड म्हणून ओळखला जातो, याचा अर्थ असा की या किल्ल्यावरती आजदेखील शिवकाळापासून नेमणूक झालेले सर्व सेवेकरी किल्ल्यावरच राहतात व छत्रपती शिवरायांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आई भवानीची सेवा करतात.
- अभयसिंह हवालदार, प्रतापगडचे किल्लेदार
किल्ल्यावरील शिवकाळापासून असलेले सेवेकरी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची ग्वाही पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्यांनी दिली. यापुढे देखील ग्रामस्थांचे असे सहकार्य राहील, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली. दोघांनीही योग्य समन्वय साधून किल्ला शिवकाळात होता अशा पद्धतीनेच होईल, अशी आशा व्यक्त केली. येणार्या पर्यटकांसाठी व शिवभक्तांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्राधिकरणामार्फत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या पद्धतीने येत्या काही काळामध्ये गडाला पुन्हा शिवकालीन वैभव प्राप्त होणार आहे.