

सातारा : छत्रपती शिवरायांनी किल्ले प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढला होता. युनेस्कोने या किल्ल्याला जागतिक मान्यता दिल्यामुळे या महापराक्रमाला नव्याने झळाळी मिळाली आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची ख्याती या निर्णयामुळे आणखी सर्वदूर पोहोचणार असून शिवप्रेमींची छाती अभिमानाने भरून आली आहे. जिल्ह्यात सर्वस्तरातून जागतिक मानांकनाच्या निर्णयाचे स्वागत होत असून जल्लोेष केला जात आहे. महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब असल्याचा सूर लोकप्रतिनिधींमधून निघाला.
शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे प्रतिक असलेले 12 शिवकालीन किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. या किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूमधील जिंजी या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश असून यांचा समावेश मराठा मिलिट्ररी लॅन्डस्केप ऑफ इंडिया या यादी अंतर्गत करण्यात आला आहे. हे केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी गौरवाचे पाऊल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरद़ृष्टीने उभारलेली ही दुर्गरचना जगभर ओळखली जाणार, हे महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल. आमच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देणार्या केंद्र व राज्य शासनाचे तसेच युनेस्कोचे विशेषत: मी मनपूर्वक आभार मानतो.
- खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, अध्यक्ष, किल्ले प्रतापगड विकास प्राधिकरण
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्काने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहेत ही देशाच्या द़ृष्टीने अभिमानाची व आनंदाची बाब आहे. युनेस्काने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची दखल घेतली आहे. शिवप्रेमी व शिवभक्त म्हणून मनापासून आनंद वाटत आहे. या नामांकनामुळे किल्ल्यांना वेगळी ओळख जगभरात मिळणार आहे. या किल्ल्यांची महती जगभर पोहोचणार आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सर्वदूर पोहोचण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून सर्व शिवभक्तांच्या वतीने अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास जगभर नेण्याचे काम या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून झालं आहे. यात सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश झाल्याने त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
- ना. शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील प्रतापगडसह 11 किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या गोष्टी घडल्या आहेत. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महायुतीचे सरकार तीन वर्षांपासून कार्य करत असताना जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश ही मोठी उपलब्धी आहे. जागतिक वारसा स्थळ यादीत किल्ले प्रतापगडचा समावेश होणे ही आपल्यासाठी मोठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे.
- ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
आज अत्यंत आनंदाचा ऐतिहासिक क्षण आहे. गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करत होतो त्याला यश आले आहे. युनेस्को यादीत राज्यातील 12 किल्ल्यांचा समावेश झाला असून त्यात किल्ले प्रतापगडाचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांचा केंद्र सरकारकडे सारखा पाठपुरावा सुरु होता. सर्व देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला त्याला यश आले आहे. किल्ले प्रतापगडाचा समावेश झाला ही अभिमानास्पद गोष्ट असून यामुळे छाती अभिमानाने फुगत आहे.
- ना. शंभूराज देसाई, पालकमंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. या किल्ल्यामुळे आम्हाला उर्जा मिळते. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने या किल्ल्यांचे जतन व संवर्धन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कायमच ऊर्जा देण्याचे काम करतील. यामध्ये प्रतापगड किल्ल्याचा समावेश झाला ही बाब जिल्ह्याच्याद़ृष्टीने अभिमानास्पद आहे.
- ना. जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री