

सातारा : महावितरणने ग्राहकांच्या मानगुटीवर ‘प्री पेड’ मीटरचे भूत आणल्यानंतर नागरिकांनी याला कडाडून विरोध केला. त्यामुळे महावितरणला हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. यावर आता ‘स्मार्ट मीटर’ आणून महावितरण सातारा जिल्ह्यातील ग्राहकांच्या खिशावर तब्बल 1 हजार 45 कोटींचा दरोडा टाकणार आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जुने मीटर बदलून नवीन मीटरची रक्कम ही ग्राहकांच्या माथ्यावर टाकण्यात येत असल्याने याला आतापासूनच विरोध होवू लागला आहे.
महावितरण कंपनीने जिल्ह्यातील ग्राहकांकडील विजेचे चालू मीटर काढून ‘स्मार्ट मीटर’ लावण्याची मोहीम सुरू केले आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनी या स्मार्ट मीटरला विरोध करायला सुरुवात केली असली तरी कंपनीचे कर्मचारी चोरून-लपून किंवा चुकीची माहिती देऊन हे मीटर लावत आहेत. या स्मार्ट मीटरची गती ही साध्या मीटरच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे वीज बिलात अगोदरच भुर्दंड लागत असताना आता नव्याने नवीन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्रत्येक मीटरला तब्बल 12 हजार रूपये मोजावे लागणार आहेत. सातारा जिल्ह्यात 8 लाख 70 हजार 875 वीज ग्राहक असून या ग्राहकांवर तब्बल 1 हजार 45 कोटी 5 लाख रूपयांचा बोजा पडणार आहे.
प्रशासन वीज गळती, वीजचोरी, अंतर्गत भ्रष्टाचार, भारनियमन या महत्त्वाच्या बाबींकडे महावितरणने लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, आपल्या कारभारात सुधारणा न करताच ग्राहकांवर बोजा टाकण्याचे काम महावितरण करत आहेत. यातूनच प्री पेड मीटर व स्मार्ट मीटर ही संकल्पना आली आहे. प्री पेड मीटरला विरोध केल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला. मात्र, हा निर्णय रद्द करेपर्यंत स्मार्ट मीटर ग्राहकांच्या मानगुटीवर बसवण्यात आले.
जिल्ह्यात 10 लाख 88 हजार 577 वीज ग्राहक आहेत. त्यातील घरगुती 7 लाख 75 हजार 914, वाणिज्यिक 65 हजार 882, औद्योगिक 11 हजार 270, पाणीपुरवठा 3 हजार 155, पथदिवे 5 हजार 436 तर 9 हजार 207 अशा एकूण 8 लाख 70 हजार 875 ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे. यातून फक्त कृषीच्या 2 लाख 17 हजार 702 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसणार नाहीत.
चोरी छुपे बसवले जाताहेत मीटर
वीज कायदा 2003 च्या कलम 55 नुसार स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नसले, तरी स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे काम चालू आहे. त्याला नागरिकांनी विरोध चालू केला आहे. असे असतानादेखील बेकायदेशीरपणे घरात घुसून वीज मंडळाचे व एजन्सीधारकांचे नियुक्त केलेले प्रतिनिधी जाणेपूर्वक वीज मीटर लावत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेकायदेशीरपणे वीज मीटर बसवण्याची मोहीम तातडीने थांबवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला आहे.