

तारळे : दररोज हजारो प्रवासी व विद्यार्थ्यांच्या प्रमुख रहदारीच्या तारळे-नागठाणे रस्त्यावर छोट्या असंख्य खड्ड्यांची अडथळा शर्यत सुरु आहे. खड्ड्यातून जागोजागी रस्ता शोधण्याची वेळ वाहन चालक व प्रवाशांवर आली आहे. कोणता खड्डा चुकवावा हेच समजत नसल्याने प्रवाशांचे मणके ढिले तर वाहनांचा खुळखुळा होत आहे. रस्त्याची दुरवस्था माहित असूनही पावसाळ्यापूर्वी खड्डे न भरल्याने पाटण व सातारा बांधकाम विभागाबाबत संताप व्यक्त होत आहे.
तारळे विभागासाठी पाटण हे तालुक्याचे ठिकाण आहे. तर सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. अठ्ठावीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही ठिकाणे आहेत. पाटणकडे जाण्यासाठी घाटरस्ता व वाहतुकीची साधने कमी आहेत. सहाजिकच नागठाणे, सातारा महत्त्वाची ठिकाणे असल्याने दररोज हजारो प्रवाशी व विद्यार्थ्यांची रहदारी सुरु असते. नागठाणे येथे कण्हेर पाटबंधारे कार्यालय परिसरात खड्ड्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तर तारळे ते दुटाळवाडी हे चार किलोमीटरचे अंतर पाटण तालुक्याच्या हद्दीतून व त्यापुढे सासपडे ते नागठाणे हे अंतर सातारा तालुक्याच्या हद्दीतून हा रस्ता जातो. हद्द निम्मी निम्मी असल्याने हा रस्ता अनेक वर्षांपासून खड्ड्यात पडलेला आहे.
सातारा तालुक्याच्या हद्दीतील दुटाळवाडी ते खडवीचा शिवार दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाले आहे. हा रस्ता करताना सासपडे गावातून जाणारा काही तांत्रिक कारणाने तसाच खड्ड्यात आहे. नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने, खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने व गावातून जाणारा रस्ता अरुंद असल्याने रहदारीच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. समोरा समोर एसटी व चारचाकी वाहन आल्यास गाडी मागे घेण्याच्या कारणावरून वादावादीचे प्रसंग येत आहेत.