Masur Jal Jeevan Project | निकृष्ट कामामुळे मसूरची जलजीवन योजना वादात
दिलीप माने
मसूर : केंद्र शासनाच्या हर घर नळ योजनेअंतर्गत राष्ट्रीय जलजीवन योजनेचे मसूर येथील सुरू असलेले काम अत्यंत संथ गतीने आणि ढिसाळ नियोजनाने सुरू आहे. निकृष्ट काम आणि भ्रष्टाचार अशा विविध कारणाने ही योजना गेली दोन -अडीच वर्षे गाजत आहे. या योजनेच्या पाणीपुरवठा पाईपसाठी जागोजागी प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर खुदाई केली. मात्र त्यानंतर रस्त्याचे काम केले नसल्याने गेली दोन वर्षे पावसाळ्यात मसूरकरांना चिखल तुडवत डबक्यातून मार्ग काढत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अंदाजपत्रकाप्रमाणे कामे झालीच नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे. बर्याच ठिकाणी पाईप्स नागमोडी वळणाच्या टाकल्या आहेत. अनेक पाईप्स दीड-दोन फुटावर पुरल्या आहेत. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराचा ही योजना उत्कृष्ट नमुना ठरली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ही योजना अद्याप प्रलंबित आहे. पावसाळा आला तरी रस्त्यांची दूरवस्था कायम आहे.
नळ जोडणीची कामे सुरू असली तरी या योजनेच्या वीज कनेक्शनचा अजून पत्ता नाही. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे अधिकारी व ठेकेदार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. मध्यंतरी मसूरच्या रस्त्यांची इतकी दयनिय अवस्था झाली होती की, मसूरकरांना अक्षरशः रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. तेव्हा या अधिकार्यांनी केवळ खडीकरण करून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली. अधिकारी व ठेकेदार मात्र केवळ बजेट वाढवून घेण्याच्या मन:स्थितीत आहेत,पण कामे लवकर पूर्ण करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत.
ग्रामसभेत धिंडवडे निघाल्यानंतर अधिकारी व ठेकेदार यांची नादुरुस्त रस्त्यांवरून ग्रामस्थांनी पायी रपेट घडवून आणत वस्तुस्थिती दाखवली. सदर अधिकार्यांनी नळ जोडणीची रक्कम ग्रामस्थांच्या माथी मारण्याचा घाट घातला आहे, मात्र नळ जोडणी ही अधिकारी व ठेकेदार यांनीच करावी या मागणीवर मसूरकर ठाम आहेत. अपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदाराला उर्वरित रक्कम देऊ नये असा ग्रामसभेत ठराव झाला असताना त्याला केराची टोपली दाखवून ठेकेदाराचे पेमेंट काढून दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. मसूरच्या या योजनेबाबत निकृष्ट कामासह भ्रष्टाचाराबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी व आरोप करून सुद्धा त्याचा खुलासा अधिकारी व ठेकेदार यांनी केला नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. नियोजनाचा अभाव, भ्रष्टाचारासह अनेक कारणांही ही योजना वादात सापडली आहे.

