Satara News : वाई एमआयडीसीत प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

दूषित पाण्याबाबत संताप : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Satara News
वाई एमआयडीसी परिसरात उद्योगातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच सोडले जात आहे.
Published on
Updated on

विकास जाधव

वाई : वाई एमआयडीसी परिसरातील फळरस, ज्यूस, जॅम तसेच अन्य खाद्यप्रक्रिया उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक मिश्रित सांडपाण्याच्या विल्हेवाटीवर शंका उपस्‍थित केल्‍या जात आहेत. संबंधित उद्योगांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यरत आहेत का? त्यांची नियमित तपासणी होते का? आणि शुद्धीकरणानंतरच सांडपाणी बाहेर सोडले जाते का? याची चौकशी करण्याची मागणी करत आहेत.

काही उद्योगांकडून दूषित सांडपाणी ओढे-नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने ते पुढे नदीपात्रात मिसळते. या प्रकारामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी दूषित केले जात आहेत. काही विहिरीतील पाणी शेतीसाठी वापरण्यायोग्य राहिले नसल्याची तक्रारही पुढे येत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करूनही कारवाई कागदावरच राहत आहे. एक दिवस कारवाई दाखवली जाते आणि त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि निष्पक्षतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

परिसरातील ओढे, नाले आणि नदीपात्रांचे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित उद्योगांची तातडीने संयुक्त तपासणी करण्यात यावी, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे लेखापरीक्षण करण्यात यावे आणि पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

पर्यावरणाचा समतोल, शेतकऱ्यांचे हित आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न लक्षात घेता, संबंधित विभागांनी कोणताही कानाडोळा न करता निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोषी आढळणाऱ्या उद्योगांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news