‘धरू का तुला, धरू’ला पोलिसांच्या बेड्या
सातारा : सोशल मीडियावरील सातार्यातील असलेली रिल्स स्टार युवकांच्या टोळीच्या माध्यमातून वेश्या व्यवसायात गुंतली असल्याचा पर्दाफाश पोलिसांनी केल्यानंतर समाजमन हादरुन गेले आहे. प्रसिध्दीसाठी वाट्टेल ते करणार्या व त्याआडून ‘धरू का तुला, धरू’ असा भलताच ‘उद्योग’ करणार्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता या टोळीला 1 दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
सायबर गुन्हेगारीचे लोन प्रत्येकाच्या घरापर्यंत आले आहे. यामध्ये आपल्या आजूबाजूला असलेले व अगदी आपल्या ओळखीचे असणारे यांच्याकडूनही फसवणूक होवू शकते. याशिवाय या सोशल मीडियाचा कोण, कसा वापर करेल याचा नेम राहिला नाही. सातार्यात दोन दिवसांपूर्वी असेच सेक्स रॅकेट चालवणार्या युवतीसह तिच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनाही घाम फुटला. सोशल मीडियावर रगील डायलॉगबाजी करुन प्रसिध्दीस आलेली तरुणीच या सेक्स रॅकेटचा एक भाग असल्याचे स्पष्ट झाले. सातारा पोलिसांचा या प्रकरणाचा तपास सुरु असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? हा उद्योग कधी पासून सुरु आहे? या भानगडींचे लाभार्थी कोणकोण आहेत? पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट तपासा
ऑस्ट्रेलिया सरकारने नुकतेच लहान मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातली आहे. सोशल मीडियाचे कसे व किती दुष्परिणाम आहेत हे ऑस्ट्रेेलियाने ओळखले आहे. भारतात देखील याची नितांत गरज निर्माण झाली आहे. पालकांनी स्वत: मुला-मुलींचे सोशल मीडियावरील अकाउंट तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेकदा कुसंगतीमुळे मुलं सोशल मीडियात वाहत जावून आपले करिअर धोक्यात आणत आहे.
दीड महिन्यांपूर्वी ओंगळवाणा व्हिडीओ...
दोन दिवसांपूर्वी सातार्यातील रिल्स स्टारसह टोळीला बेड्या ठोकल्यानंतर त्याबाबत अनेक सुरस चर्चा रंगू लागल्या आहेत. ‘असले उद्योग’ अनेक महिन्यांपासून सुरु असल्याचे बोलले जात आहेत. यामुळे कोणाला कितीवेळा काय पुरवले गेले हे मोबाईल डिटेल्सवरुन स्पष्ट होईल. यामुळे अनेकांचे धाबेही दणाणले आहेत. दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी ‘स्वत:चाच बिभत्स प्रकारचा व्हिडीओ’ स्वत:च्या स्टेटसला मिरवला गेल्याचे बोलले जात आहे. यामुळे सातार्यातील तरुणाई भरकटल्याचे वास्तव आहे.

