

सातारा : साताऱ्यातील जरंडेश्वर नाका ते वाढे फाटा येथे शाहूपुरी पोलिसांनी शुभम हिंदुराव चतुर (वय 31, रा. खेड नांदगिरी, ता. कोरेगाव) याला अटक करून मॅगझीनसह पिस्टल जप्त केले. यासह दोन जिवंत काडतुसेही पोलिसांना सापडली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलिस दाखल जुन्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेत होते. शुभम चतुर हा वाढे फाटा परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पोलिसांनी पथक तयार केले. पोलिस वाढे फाटा परिसरात गस्त घालत असताना संशयित शुभम चतुर त्यांना दिसला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले.
पोलिसांनी संशयित शुभम चतुर याची अंगझडती
घेतली असता त्याच्याकडे पिस्टल सापडले. यामध्ये मॅग्झीन व दोन जिवंत काडतुसे देखील होती. पोलिसांनी 77 हजार रुपये किंमतीचा हा सर्व मुद्देमाल जप्त केला व संशयिताला ताब्यात घेतले. पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही कारवाई केली.