

फलटण : फलटण-पंढरपूर मार्गावर बरड, ता. फलटण येथे मिनी ट्रॅव्हल्सचा थरारक अपघात झाला. ही ट्रॅव्हल्स हवेत उडून रस्त्यावर आपटत पलटी झाली. या भीषण अपघातात दुभाजकही तुटला. तर रस्त्यावरील एक पादचारी जागीच ठार झाला. एकजण बचावला. ट्रॅव्हल्समधील 17 प्रवासी जखमी झाले आहेत. जालिंदर लक्ष्मण सस्ते (रा. बरड, ता. फलटण, जि. सातारा) असे अपघातात ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
या अपघात प्रकरणी ट्रॅव्हलचालक दीपककुमार, (रा.उत्तर प्रदेश) याच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पांढरी मिनी ट्रॅव्हल्स (एमएच05,9705) पंढरपूरकडे भरधाव वेगाने निघाली होती. बरड एसटी स्टँड समोर रस्ता क्रॉस करण्यासाठी सिमेंटचे बॅरिकेटिंगच्या कडेला थांबलेल्या जालिंदर सस्ते यांना ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली. पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल्स दुभाजक फोडत पलटी झाली.
ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत सस्ते यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. ट्रव्हलचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्या हा अपघात झाला. या ट्रॅव्हल्समध्ये 17 जण प्रवास करत होते. सुदैवाने त्यातील कोणीही गंभीर जखमी झाले नाही. अपघाताची फिर्याद युवराज नामदेव ताटे यांनी दिली असून अधिक तपास चांगण पोलिस करत आहेत.