

फलटण : फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी कमी करून ते कोणालाही दिले जाणार नाही, असा विश्वास मंत्री राधाकृष्ण विख-पाटील यांनी फलटण तालुक्यातील शेतकर्यांना पुणे येथे माध्यमांसमोर बोलताना दिला.
फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी कमी करून ते इतर तालुक्यांना दिले जाणार असल्याच्या शक्यतेने संभ्रमित झालेले शेकडो शेतकरी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटले. यावेळी त्यांनी फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत कमी करू नका? जेणेकरून तालुक्याचे उसाचे क्षेत्र कमी होऊन कारखान्यांना ऊस कमी पडेल. तसेच फळबागा, गहू, ज्वारी, हरभरा पिकांनाही त्याचा फाटका बसेल अशा प्रकारची भीती फलटण तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापुढे व्यक्त केली.
शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, फलटण तालुक्याचे हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत कमी केले जाणार नाही. फलटणकरांच्या हक्काचं पाणी ते त्यांचेच राहील. ते कमी करून इतरांना दिले जाणार नाही. अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल तेव्हा मागणीनुसार त्याचे वाटप केले जाईल. मात्र फलटणच्या हक्काच्या पाण्यावर कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही.
यावेळी जलसंपदा विभागाने मोठ्या प्रमाणात वाढवलेली शेती पाणीपट्टी कमी करण्याचा प्रश्न मंत्री महोदयांसमोर मांडला. त्यावर याबाबत निर्णय घेऊ असे ते म्हणाले. पाणी वापर संस्था चांगल्या पद्धतीने काम करत असून वसुलीही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र पाणी वापर संस्थांना त्यांचा देय असलेला परतावा वेळेवर दिला जात नाही. तो तातडीने मिळावा. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मार्च मध्येच हा परतावा देण्याचा प्रयत्न करू. मंत्री महोदयांनी फलटणच्या शेतकर्यांना पाणी प्रश्नावरून दिलासा दिल्याने सध्या तरी फलटणचे पाणी कमी होण्याचं अरिष्ट टळल्याच्या भावना व्यक्त करून शेतकर्यांनी मंत्री महोदयांना तसेच आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना धन्यवाद दिले.