

सातारा : सासपडे येथील चिमुकलीचा झालेला खून व फलटण येथे डॉ. संपदा मुंडे यांनी गळफास घेऊन केलेली आत्महत्या या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दोघींना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.
कराड येथे प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते. खा. उदयनराजे म्हणाले, सासपडे व फलटण प्रकरणात तपास, चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास करावा, असे अनुचित प्रकार पुन्हा होता कामा नये. संशयित आरोपी कोणीही असला, तरी शिक्षा ही झालीच पाहिजे. या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांना कठोरात कठोर म्हणजे शिक्षा म्हणजेच फाशीच झाली पाहिजे.
ज्या भागात अशा घटना घडल्या आहेत, त्यानिमित्ताने संबंधित सर्वांना विनंती आहे की, आपल्याकडे जी काही माहिती आहे, ती तपास यंत्रणेला द्यावी. यातून लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षाच दिली जावी. खून, आत्महत्या ही प्रकरणे संवेदनशील आहेत. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. कोणीही कुठल्याही पदावर असू द्या. एक जबाबदार नागरिक या नात्याने माझ्या परीने पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणा, हेच मी माझे कर्तव्य समजतो, असेही ते म्हणाले.