Ashadhi Wari: माऊलींसाठी ‘श्रीरामनगरी’ सज्ज वारकऱ्यांच्या सेवेसाठी जय्यत तयारी

आज फलटणमध्ये मुक्काम
Ashadhi Wari
Ashadhi Wari
Published on
Updated on
पोपट मिंड

फलटण : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज शुक्रवार दि. १७ जुलै रोजी फलटणच्या श्रीरामनगरीत मुक्कामासाठी दाखल होत असून, माऊलींच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. स्वागत कमानी, आकर्षक रोषणाई, सेवा उपक्रम आणि विविध सोयी-सुविधांमुळे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले असून प्रशासन, नगरपालिका, पोलीस, आरोग्य, वीज व महसूल विभागांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे.

पालखीने १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करून लोणंद येथे पहिला मुक्काम केला. त्यानंतर १६ जुलै रोजी तरडगाव येथे मुक्काम करून आज फलटणमध्ये आगमन होत आहे. १८ जुलै रोजी पालखीचा मुक्काम बरड येथे होणार असून १९ जुलै रोजी पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

फलटण नगरपालिकेने पालखी मार्गाची दुरुस्ती, पालखीतळाची स्वच्छता, २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टँकर सुविधा, चौकशी कार्यालय, आपत्कालीन मदत कक्ष, हिरकणी कक्ष आणि वैद्यकीय कक्ष उभारले आहेत. वारकऱ्यांसाठी अत्यावश्यक मोबाईल क्रमांकांची माहिती पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘निर्मल वारी, स्वच्छ वारी’ या संकल्पनेनुसार पालखीतळावर शेकडो तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात आली असून, नागरिकांनीही आपल्या परिसरातील स्वच्छतागृहे वारकऱ्यांसाठी खुली करावीत, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण झाल्याची माहिती दिली.

पोलिस विभागाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून शेकडो पोलीस कर्मचारी व होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत. कोळकी व जाधववाडी ग्रामपंचायतींकडूनही वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, निवासासाठी तंबू आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यंदा अंतर्गत पालखी मार्गाचे काम पूर्ण झाल्याने आणि आधुनिक स्ट्रीट लाईटमुळे मार्ग प्रकाशमान झाला असून वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होणार आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून स्वच्छता, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांचे प्रभावी नियोजन करण्यात आले असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आ. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांनी समन्वय साधला आहे.

माऊलींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी अन्नदान, पाणीदान आणि वारकरी सेवेसाठी स्वयंसेवी संस्था, मंडळे व नागरिक पुढे सरसावले आहेत. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने श्रीरामनगरी दुमदुमून गेली असून भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news