Shriram Sugar Factory : श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे

विशेष सभेत जवाहर शेतकरी कारखान्यासोबतचा करार रद्द
Shriram Sugar Factory
Shriram Sugar Factory
Published on
Updated on

फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यासोबतचा भागीदारी करार रद्द करण्यास तसेच शासन निर्णयानुसार कारखाना, अर्कशाळा व मद्य विभाग सहकारी अथवा खासगी संस्थेला चालविण्यास देण्याबाबत कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, आगामी काळात हा कारखाना श्रीदत्त इंडिया यांना चालवण्यास देण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ॲड. अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन नितीन भोसले व संचालक, सभासद उपस्थित होते.

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्यासोबत 9 मार्च 2022 रोजी झालेला भागीदारी करार रद्द करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यावेळी बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी साखरेच्या दरातील चढ-उतार, शासन नियमांनुसार ऊस उत्पादकांना वेळेवर एफआरपी देण्याची जबाबदारी, तोडणी-वाहतूक खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, कमी कालावधीसाठी कारखाना चालवण्यामुळे सतत तोटा सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर जवाहर कारखान्याने मुदतीपूर्वी करार रद्द करण्याबाबत पत्र दिल्याने विशेष सभा बोलावून पुढील निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संजीवराजे पुढे म्हणाले की, कारखाना स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र ‌‘नेटवर्क उणे‌’ असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज मिळू शकले नाही. परिणामी कारखाना अखंडित सुरू ठेवणे, ऊस उत्पादकांना व कामगारांना वेळेवर देयके देणे या उद्देशाने सहकारी किंवा खासगी संस्थेकडे चालवण्यास देण्याचा पर्याय स्वीकारावा लागला.

कारखान्याने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी श्री दत्त इंडिया प्रा. लि.ने अधिकचा मोबदला देण्याची तयारी दर्शवल्याने शासनाच्या मंजुरीनंतर त्यांच्याशी अंतिम करार करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे चेअरमन डॉ. शेंडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या प्रतिनिधींनी गत हंगामातील ऊसाला प्रतिटन 3200 रुपये व अतिरिक्त 200 रुपये दिवाळीपर्यंत देण्याचे आश्वासन पूर्ण करणार कोण, असा सवाल उपस्थित केला. त्यावर संजीवराजे यांनी पूर्वी झालेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.

सभेत ॲड. नरसिंह निकम यांनीही करार प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंत्री समितीने जवाहरसोबत करार करताना प्रतिटन किमान 200 रुपये श्रीरामला मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती; मात्र प्रत्यक्ष करारात त्याचा उल्लेख नसल्याचे सांगत सुमारे 44 कोटी रुपयांचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना बोलण्याची पुरेशी संधी दिली नसल्याची खंत व्यक्त केली. नव्या करार प्रक्रियेत सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केली.

दरम्यान नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्टेजवरून खाली उतरून त्यांच्या जवळ जाऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. संचालक सुखदेव बेलदार पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. दरम्यान, सभेसाठी कारखाना परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभास्थानी प्रवेश देताना सभासदांची स्वतंत्र पडताळणी करण्यात येत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news