

फलटण : फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गट व पंचायत समितीच्या 16 गणांची मतमोजणी आज दि. 9 रोजी सकाळी 10 वाजता सुरु होत आहे. फलटणला शिवसेना शिंदे गटविरुद्ध भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली असून पक्षीय लढत झाली असले तरी तालुक्यात राजे गट विरुद्ध खासदार गट अशीच लढत ओळखली जाते.
राजे गट वर्चस्व राखणार की आमदारकी व नगरपालिकेप्रमाणे जि.प., पं.स निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी विजयाची पताका फडकवून मुसंडी मारणार याबाबत सर्वच उमेदवार कार्यकर्ते समर्थकांकडून दावेप्रति दावे करण्यात येत आहेत. निवडणुकीत अत्यंत चुरशीने विक्रमी 72 टक्के मतदान झाले असून मतदारांनी आपला कौल दिला असला तरी बंद पेटीतील कौल ऐकण्यासाठी उमेदवारांसह तालुक्यातील नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
2017 साली पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस-भाजप मित्रपक्ष आघाडी अशी चुरशीची लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीने म्हणजेच राजेगटाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. तालुक्यात नंतरच्या काळात राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली असून तालुक्यात काँग्रेसचे अस्तित्वच राहिले नाही. तर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. असं असलं तरी पारंपारिक लढत मात्र राजे गट विरुद्ध खासदार गट अशीच रंगली. तरडगाव गटात भाजपचे सूर्यकांत खरात विरुद्ध शिवसेनेचे गिरीश बनकर अशी दुरंगी लढत झाली. धनगर व माळी समाजाचे गणित या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे. येथे माजी आमदार दीपक चव्हाण यांचे कार्यकर्तृत्व पणाला लागले आहे. साखरवाडी गट राजे गटाने व खासदार गटाने प्रतिष्ठेचा केला होता. या ठिकाणी शिवसेनेच्या रूपाली सरगर विरुद्ध भाजपच्या संचिता कांबळे यांच्यात सरळ सामना रंगला.
या ठिकाणी बसपा व वंचित आघाडी निकालाला कौल देऊ शकतात. विडणी गट दोन्ही राजकीय गटाच्या प्रमुख हेवी वेट स्थानिक नेतृत्वांसाठी विडणी गटातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. येथे अनुसूचित जाती महिला उमेदवारांपेक्षा स्थानिक नेतृत्वांनी ही निवडणूक अटीतटीची केली. सरपंच सागर अभंग विरुद्ध कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे यांचे गट आमने-सामने निकराने लढले. शिवसेनेच्या ज्योती मोरे विरुद्ध राष्ट्रवादीच्या सुषमा मोरे यांच्यात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. बरड गटातही भाजपचे भाऊसाहेब मोरे विरुद्ध शिवसेनेच्या वैशाली कांबळे यांच्यातील लढतीकडेही तालुक्याचे लक्ष लागून राहिले असून येथे षटकोनी संघर्षात मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो हे पाहावे लागणार आहे.
अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलेल्या गुणवरे गटातील लढत अनुभव विरुद्ध नवकेपणा अशीच झाली. राष्ट्रवादीच्या ऋतुजा जगताप विरुद्ध शिवसेनेच्या हेमलता जगताप यांच्यात लढत झाली. येथील लढतही राजेगट व खासदार गटाने प्रतिष्ठेची केली होती. हिंगणगाव गटामध्ये धैर्यशील अनपट यांची प्रतिष्ठापनाला लागली असून येथे जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेनेचा सारिका अनपट विरुद्ध भाजपाच्या किरण नलावडे या ठिकाणी शिवसेनेचे अनपट यांचा असलेला जनसंपर्क विरुद्ध खासदार गटाने नव्याने उभे केलेली संघटन शक्ती नलवडे यांच्या किती कामी येते हे पाहावे लागणार आहे. निकालाची उत्सुकता येथे शिगेला पोहोचली आहे.
कोळकी जिल्हा परिषद गटातील निवडणुकीकडे तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उजवा हात म्हणून सर्वश्रृत असलेले जयकुमार शिंदे हे भाजपकडून लढत आहेत तर माजी आमदार चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम शिवसेनेकडून लढत आहेत. दोघांनीही एकमेकांना तकडे आव्हान उभे केले आहे. यामुळे येथील लढत अत्यंत लक्षवेधक ठरली असून दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या वाठार निंबाळकर गटातील निवडणूक भाजपचे विष्णुपंत लोखंडे विरुद्ध शिवसेनेचे निलेश लोखंडे यांच्यातील लढत पैलवानांच्या लढतीसारखी प्रतिष्ठेची ठरली असून अनेक डावपेच वापरले गेले आहेत. यात कोणता पैलवान सरस ठरेल हे ऐकण्याची उत्सुकता लागून राहिले आहे.
पंचायत समिती गणांमध्ये आसू गणातील निवडणुका अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी गण राखीव असून शिवसेनेचे भीमराव पवार विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय पवार अशी लढत असली तरी या लढतीला शिवरुपराजे खर्डेकर विरुद्ध राजे गट असे स्वरूप मिळाले आहे. फलटण पूर्व भागातील आसू गणातील गावांचा बारामती मतदारसंघाशी सातत्याने संपर्क येत असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला यश मिळण्याची अधिकची खात्री आहे. पंचायत समिती साखरवाडी गणातील निवडणूक मूळचे ओबीसी विरुद्ध कुणबी ओबीसी ही लढत प्रतिष्ठेची झाली असून गुरु शिष्यांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. सातत्याने एक हाती वर्चस्व राखलेल्या सुरवडी गणात वर्चस्वाची परंपरा प्रल्हाद साळुंखे पाटील आपल्या चिरंजीव यांचा विजय सुखकर करून राखणार का? याची उत्सुकता लागून राहिली आहे. तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या निवडणुका अटीतटीच्या झाल्या आहेत.